होंडा परिसरात पोलीस गस्त वाढवा
By admin | Published: September 14, 2015 02:02 AM2015-09-14T02:02:57+5:302015-09-14T02:03:16+5:30
होंडा : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रात अवघ्या आठ दिवसांत भरदिवसा दोनवेळा धाडसी चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे
होंडा : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रात अवघ्या आठ दिवसांत भरदिवसा दोनवेळा धाडसी चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यासाठी पर्ये भाजपाचे युवा नेते तथा खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष विश्वजीत कृ. राणे यांनी रविवारी
(दि.१३) पर्ये मतदारसंघातील सरपंच, पंच, वाळपई पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन होंडा व इतर भागात वाढत चाललेली परप्रांतीयांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आखावी. त्याचबरोबर परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी केली.
बैठकीस वाळपई पोलीस स्थानकातर्फे पोलीस उपनिरीक्षक शिरोडकर, हवालदार अनिल हजारे, होंडा सरपंच उर्मिला माईणकर, उपसरपंच उल्हास गावडे, केरीचे पंच जिवबा राणे, मोर्ले सरपंच सुशांत पास्ते व पंचसदस्य उपस्थित होते.
या भागात अवघ्या आठ दिवसांत दोन चोरीच्या घटना घडल्या. हा गंभीर विषय असून पोलिसांनी कसून चौकशी करून दोन्ही चोरी प्रकरणांचा छडा लावावा. त्याचप्रमाणे दोन दिवसांनंतर गणेश चतुर्थी आहे. त्या वेळी होंडा व परिसरात राहणारे स्थानिक मूळ गावी किंवा घरी जाणार आहेत. त्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, असे राणे यांनी सांगितले.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक शिरोडकर म्हणाले, नागरिकांनी भाडेकरू ठेवताना त्यांची माहिती कायद्यानुसार सात दिवसांच्या आत स्थानिक पोलीस चौकीवर देणे गरजेचे आहे. तसेच माहिती न दिल्यास संबंधित घरमालकांवर गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
उर्मिला माईणकर यांनी वाळपई पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन मतदारसंघ येतात. त्यासाठी सरकारने वाळपई पोलीस स्थानकाला आणखी दोन पीसीआर वाहने पुरवावीत, अशी मागणी केली. (वार्ताहर)