“भारत हिंदू राष्ट्र, भगवा देशाचा प्राण; हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज”: संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 09:24 AM2023-08-25T09:24:27+5:302023-08-25T09:26:01+5:30
कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि भगवा झेंडा हा देशाचा प्राण आहे. गोवा राज्य देशाचा हिस्सा असल्यामुळे कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रध्वज तिरंगा बनविलेला आहे. हिरवा हा इस्लामिक रंग आहे. मुस्लिमांनी आपल्या देशावर ८०० वर्षे राज्य करून हिंदूवर बरेच अत्याचार केले आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी मांडले.
दवर्ली येथील समर्थ गडावर आयोजित केलेल्या सभेत 'छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गोमंतकातील मठ-मंदिर हिंदू धर्म रक्षणार्थ दिलेले योगदान आणि पोर्तुगीजकालीन विध्वंस झालेल्या मंदिरांची पुनर्स्थापना' या विषयावर ते बोलत होते.
गोव्यात हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन सुरुवातीला दोन हजार युवकांची एक तुकडी तयार करण्याची गरज आहे. नंतरच्या काळात एक-एक तरुण त्यांच्या तुकडीला जोडला जाऊन हिंदूंची मोठी फौज तयार होणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी मराठ्यांचा मेळावा भरत असतो. गोव्याच्या तुकडीने दरवर्षी शिवनेरीवर जाऊन मराठ्यांच्या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही भिडे यांनी केले.
रामायण, महाभारत, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व युद्धाचे शिक्षण त्यांनी त्यांच्याकडून घेतले. शहाजी महाराज त्यांचे वडील. ते मोगलांकडे नोकरी करीत होते. तरी त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी मोगलांविरुद्ध युद्ध पुकारले. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे शहाजी महाराजांचे स्वप्न होते. शिवरायांनी १५ ते ३५ वर्षांत मोगलांशी युद्ध करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंचे रक्षण केल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले
इंग्रजांनी मोगलांकडून देश बळकावून घेऊन हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले. कायद्यांत बदल केले. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन पाल यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात केली. अखेर प्रदीर्घ काळानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे हिंदूचे भाग्य समजावे लागेल.