भारत हे देशाचे समृद्ध नाव; नाहक वाद नको: व्यंकय्या नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:34 AM2023-11-02T08:34:02+5:302023-11-02T08:34:50+5:30
दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारत हे देशाचे समृद्ध असे नाव आहे. मात्र काही जण त्याला विनाकारण आक्षेप घेत आहेत. त्यामुळे कुणीही त्यावरून वाद निर्माण करू नये, असे मत माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित आठ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिवसानिमित आयोजित एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, आयएएस अधिकारी मिहीर वर्धन तसेच या राज्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.
माजी उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, आमचा देश वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरेने नटलेला आहे. हा आमचा अभिमान आहे. विविधता व एकतेचा याव्दारे संदेश दिला जात आहे. आमच्या देशात वेगवेगळ्या भाषा असून सर्व धर्म, जातींचे लोक एकत्र राहत आहेत. कारण, आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत. इंडिया ऐवजी आता भारत असे संबोधले जात आहे. भारत हे नाव समृद्ध आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचा विषयच नाही. मात्र काहीजणांना त्यावर आक्षेप आहे. त्यांचा हा विनाकारण आहे. तर काहीजण असेही असतात, जे आक्षेपही नोंदवत नाहीत व त्यावर कुठलीही प्रतिक्रियाही देत नाहीत. भारत या नावावरून वाद नको असे त्यांनी सांगितले.
काही राज्यांमध्ये सीमा तसेच भाषेवरून वाद आहेत. या राज्यांनी आपापसात सामंजस्याने एकमेकांशी चर्चा करून वाद मिटवावा. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी. प्रत्येक राज्यांमध्ये स्वत:ची मातृभाषा आहे. मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काम व्हावे, असेही नायडू यांनी नमूद केले.