विदेशी नागरिकाकडून गोव्यातील कळंगुट भागातून अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:50 PM2017-12-21T16:50:37+5:302017-12-21T16:51:20+5:30
पुढील आठवड्यात साजरा होणा-या नाताळ सणानिमित्त आयोजित होणा-या पार्ट्यावर लक्ष केंद्रित करुन अमली पदार्थाची विक्री करणा-या एका विदेशी नागरिकाकडून कळंगुट पोलिसांनी ४ लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
म्हापसा - पुढील आठवड्यात साजरा होणा-या नाताळ सणानिमित्त आयोजित होणा-या पार्ट्यावर लक्ष केंद्रित करुन अमली पदार्थाची विक्री करणा-या एका विदेशी नागरिकाकडून कळंगुट पोलिसांनी ४ लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थ प्रकरणात विदेशी नागरिकांना अटक होण्याची एका आठवड्यातील ही दुसरा घटना आहे.
पुढील आठवड्यात २५ डिसेंबर रोजी साजरा होणाºया नाताळ सणानिमित्त किनारी भागात खास करुन कळंगुट इथे मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांत अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या आयव्हरी कोस्ट देशातील नागरिक जॅरी अॅलेक्स (३७) याला कळंगुट पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर मोठ्या शिताफीने अटक केली.
कळंगुट जवळ असलेल्या कांदोळी पंचायत क्षेत्रातील अण्णा वाड्यावर एक विदेशी नागरिक अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; पण तो नक्की कधी येणार याची माहिती उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले होते. शेवटी संशयित कांदोळी भागात येणार असल्याचे समजतात त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. पथक तयार करण्यात आले तसेच पोलिसांची गस्तही सुरु करण्यात आली. बुधवारी रात्री पोलिसांना तो कांदोळी भागात दिसताच त्याला अटक करण्यात आली.
आणलेल्या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना पोलीस आपल्या मार्गावर असल्याची चाहुल त्याला लागली. लागलीच त्याने घटना स्थळावरुन पळ काढण्यास सुरुवात केली. त्याला पकडण्यास आलेल्या पोलिसांनी त्याला पाठलाग सुरु केला. त्याचा बराच पाठलाग केल्यानंतर शेवटी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २.४० लाख रुपयांचे एलएसडी तसेच १.५० लाख रुपयांचे एमडीएमए प्रकारचे अमली पदार्थ मिळून ३.९० लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले. त्याने वापरलेली एक दुचाकी तसेच एक मोबाईल फोन सुद्धा ताब्यात घेण्यात आला. बुधवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नाताळ सणाच्या पूर्वी कळंगुट पोलिसांनी केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे तर एका आठवडा भरात उत्तर गोव्यात विदेशी नागरिकांवर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या आठवड्यात पेडणे पोलिसांनी हरमल या किनारी भागात दोन जर्मन नागरिकांकडून ६४ लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. कळंगुट येथील प्रकरणाची चौकशी निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेली आहे. दळवी यांच्या सोबत उपनिरीक्षक महेश नाईक, सीताराम मळीक तसेच इतर पोलीस या मोहिमेत सहभागी झाले होते.