ओसीआय कार्डसाठी हवे भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र! केंद्र सरकारने मागणी केली मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 01:07 PM2024-04-22T13:07:15+5:302024-04-22T13:08:00+5:30
गोमंतकीयांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे, असे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केल्याने तो पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांसाठी फार मोठा दिलासा ठरला आहे.
ओसीआय कार्डासाठी अर्ज करताना पर्यायी दस्तऐवज म्हणून भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र जोडता येईल. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांसाठी फार मोठी अडचण निर्माण झाली होती. गोवा सरकारने हा विषय केंद्र सरकारकडे नेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासह केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची भेट घेऊन पासपोर्ट आणि ओसीआय कार्डसंदर्भातील गोमंतकीयांचा प्रश्न सोडवण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी केली होती. पासपोर्ट जमा केल्यानंतर ओसीआय कार्ड मिळविण्यात गोमंतकीयांना अडचणी येत आहेत. या अडचणींतून गोमंतकीय नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी असल्यामुळे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याचे प्रकार गोव्यात झाले आहेत. याचा अनेक गोमंतकीयांना फटका बसला आहे. पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी झाली म्हणून सुमारे ७० जणांचे पासपोर्ट रद्द केलेले आहेत. विदेशी नागरिकाला भारतीय पासपोर्ट मिळत नाही. त्यामुळे त्याचा पासपोर्ट रद्द होतो.
लोकसभेत आवाज
पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी झाली म्हणून भारतीय पासपोर्ट रद्द करू नये, अशी मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही राज्यसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी यावर लोकसभेत आवाज उठवला होता.