होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनी गुंतवणूक करावी, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 08:29 PM2019-01-23T20:29:39+5:302019-01-23T20:30:11+5:30
होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे. ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
पणजी - होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे. ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव रोशन जग्गी, सेंट्रल कौन्सिल फॉर रीसर्च इन होमियोपॅथीचे (सीसीआरएच)डॉ. राज. के. मनचंदा, फ्रान्समधील इसीएचच्या अध्यक्षा डॉ. हेलेन रेनॉक्स, सीसीआरएचचे उप सरसंचालक डॉ. अनिल खुराना यावेळी उपस्थित होते. तीन दिवस ही आंतरराष्ट्रीय परिषद चालणार असून होमियोपॅथी औषध क्षेत्रातील क्रांती, नियमन तसेच या क्षेत्रासमोर असलेली आव्हाने याबाबत व्यापक चर्चा या परिषदेत होणार आहे. या परिषदेत २0 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून यात जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, अर्जेंटिना, आॅस्ट्रेलिया, जपान, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, श्रीलंका आदी राष्ट्रांचा समावेश आहे.
मंत्री नाईक पुढे म्हणाले की, ‘ होमियोपॅथी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार कटिबध्द आहे आणि त्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. होमियोपॅथी डॉक्टरना तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नजीकच्या काळात संसदेत कायदा दुरुस्त्या येणार आहेत. होमियोपॅथी औषधे प्रदर्शनात लावता येतील. विक्री खुली होईल. औषध विक्रेत्यांना ही औषधे विकण्यासाठी स्वतंत्र परवाना घ्यावा लागणार नाही.’
ते म्हणाले की,‘भारतात जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. अँटिबायोटिक्स औषधांमुळे आरोग्याला बाधा पोचत असल्याने लोक होमियोपॅथीकडे वळत असून पर्यायी उपचार पध्दती म्हणून ती लोकप्रिय ठरत आहे. संसर्गजन्य रोगही होमियोपॅथीने बरा होऊ शकतो.’
२ लाख होमियोपॅथी डॉक्टर
संयुक्त सचिव रोशन जग्गी म्हणाले की,‘ होमियोपॅथी उपचार पध्दतीमध्ये आता लोकांचा अधिकाधिक विश्वास निर्माण होत आहे आणि ही उपचारपध्दती लोकप्रियही होत आहे. भारतात सुमारे २ लाख नोंदणीकृत होमियोपॅथी डॉक्टर आहेत. सुमारे ६00 कंपन्या होमियोपॅथी औषधांचे उत्पादन करीत आहेत. हे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे त्यामुळे याचा अधिकाधिक वापर करुन या उपचार पध्दतीत नाविन्य आणायला हवे. होमियापॅथी उपचार आता पारंपरिक पध्दतीनेच करुन किंवा जो काही वारसा मिळाला आहे त्या पध्दतीनेच करुन चालणार नाही. या क्षेत्रापुढेही नवी आव्हाने आहेत. अधिकाधिक संशोधन व्हायला हवे आणि शास्रीय अधिष्ठानही लाभले पाहिजे. ही परिषद त्यादृष्टिने व्यापक चर्चेसाठी योग्य व्यासपीठ ठरेल.’