प्रमोद सावंत सरकारकडून गोव्यात भंडारी समाजावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 09:13 PM2020-08-05T21:13:02+5:302020-08-05T21:13:20+5:30
किरण कांदोळकर यांच्याकडून आरोप: समाजात एक प्रकारची अस्वस्थता
सुशांत कुंकळयेकर
मडगाव: मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना गोव्यात भाजप पक्षात भंडारी समाजाला जो मान होता तो आता नाहीसा झाला आहे . डॉ. प्रमोद सावंत सरकारने भंडारी समाजावर अन्याय केला आहे अशी तीव्र भावना समाजात तयार होऊ लागली आहे असे मत भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी व्यक्त केले आहे.
भंडारी समाजातील प्रभावी नेते असलेले कांदोळकर यांनी मंगळवारी गोवा फोरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळीच भाजपातून काँग्रेस आमदार रवी नाईक यांच्या दोन्ही पुत्राना भाजपात प्रवेश दिला जाईल हे वृत्त प्रसारित झाले. राजकीय विश्लेषक या दोन्ही घटनांची एकामेकाशी सांगड घालीत आहेत. कांदोळकर भंडारी मतपेटी आपल्याकडे ओढू शकतील अशी भीती भाजपला वाटू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर कांदोळकर यांच्याशी संपर्क साधला असता, होय सध्या हा समाज भाजपात अस्वस्थ आहे आणि पुढच्या निवडणुकीत तो वेगळा विचार करू शकेल, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, 2012 साली मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात 4 भंडारी मंत्री होते. 2017 साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर या समाजातील तिघांना मंत्रिपद मिळाले, खरे तर आता पार्रिकर यांचेच सरकार डॉ. सावंत पुढे चालवीत आहेत तरीही या मंत्रिमंडळात केवळ एकाच भंडारी मंत्री आहे. पर्रिकर असताना या समाजालाया पुरेसे प्रतिनिधीत्व त्यांच्या मंत्रिमंडळात मिळायचे आता ते मिळत नाही, यामुळेच हा समाज दुखवला गेला आहे , असे ते म्हणाले.
विजय सरदेसाई याना भेटण्यासाठी ते का गेले असे विचारले असता ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत गोव्यात प्रादेशिक पक्षांचे सरकारच चांगले प्रशासन देऊ शकते असा माझा ठाम विश्वास आहे. मी स्वतः माझा पक्ष काढू पाहत आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या पुढाऱ्यां मी सध्या भेटत आहे. यापूर्वी मी मगोचे सुदिन ढवळीकर याना भेटलो होतो, लवकरच दयानंद नार्वेकर यांनाही भेटणार असे त्यांनी सांगितले.