सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची होणार चौकशी
By admin | Published: May 11, 2017 01:38 AM2017-05-11T01:38:31+5:302017-05-11T01:43:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कवाळपई : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळपई : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे.
संस्थेत अलीकडेच सोने तारण घोटाळा झाला होता. त्यासंबंधी संचालक मंडळाने कानावर हात ठेवल्याने संस्थेचे सभासद चिंताग्रस्त होते. संस्थेत अनेकांनी सोने तारण ठेवून कर्ज काढले असल्याने त्यांचे सोने सुरक्षित आहे की नाही, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच चौकशीचा आदेश काढल्याने संस्थेतील कथित गैरव्यवहारांचा पर्दाफाश होणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या खऱ्या सोन्याच्या जागी खोटे सोने ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता; पण त्याविषयी वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली व संस्थेची चौकशी करण्याचा आदेश दिला. याविषयी संचालक मंडळाने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी संस्थेत सोन्याचा घोटाळा झाल्याचे मान्य केले आहे; पण तो कोणी केला याविषयी अजूनही माहिती दिलेली नाही. संचालक मंडळाने याबाबत मौनव्रत धारण केले असून हे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे.