सरकारने कायदेशीर प्रक्रिया वगैरे घेऊन बसण्या ऐवजी, थेट...; कॉंग्रेस आमदारला गोव्यात हवंय युपी मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 12:47 PM2022-07-14T12:47:42+5:302022-07-14T12:48:53+5:30
जुने गोवा येथील बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी सरकारने तात्काळ कारवाई करावी आणि तो बंगला तोडून टाकावा, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी गोवा विधानसभेत केली होती. या मागणीवर चर्चा करताना विजय सरदेसाई, वेन्जी विएगश आणि क्रूझ सिल्वा यांनी हे बांधकाम पाडलेच पाहिजे, असा आग्रह धरला.
वासुदेव पागी -
पणजी - जुने गोवा येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या चर्चस्थळात होणारे बांधकाम पाडण्यासाठी सरकारने कायदेशीर प्रक्रिया वगैरे घेऊन बसण्या ऐवजी, गोवा सरकारने युपी मॉडेल स्विकारावे आणि बांधकाम पाडून टाकावे, अशी मागणी कॉंग्रेस आमदार युरी आलेमाव यांनी विधानसभेत केली आहे.
जुने गोवा येथील बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी सरकारने तात्काळ कारवाई करावी आणि तो बंगला तोडून टाकावा, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी गोवा विधानसभेत केली होती. या मागणीवर चर्चा करताना विजय सरदेसाई, वेन्जी विएगश आणि क्रूझ सिल्वा यांनी हे बांधकाम पाडलेच पाहिजे, असा आग्रह धरला. यावर नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे, संबंधित प्रकरण न्यायालयात पडून असल्याचे सांगत होते. तसेच पंचायत संचालनालयापुढेही त्याची सुनावणी सुरू असल्याचे सांगत होते.
यावेळी आमदार युरी आलेमाव उभे राहिले आणि सरकार या बाबतीत प्रामाणिक असल्यास आपल्याजवळ पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. ते पर्याय काय सांगतात याकडे सभागृह कुतूहलाने पाहत असतानाच, त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा युपी मॉडेल स्विकारण्याची मागणी केली. कोणतीही प्रक्रिया न करता थेट कारवाई करण्याची पद्धत गोव्यात का स्वीकारू नये, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
यावर मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेत युरी यांना हा मुद्दा वेगळ्या दिशेने न्यायचा आहे आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा असल्याचे सांगितले. यात दोघांची एकमेकांवर शब्दफेकही झाली, परंतु सभापती रमेश तवडकर यांनी, या विषयावर खूप वेळ चर्चा झाली असल्याचे सांगून, पुढील प्रश्न विचारण्याची सूचना केली.