...आणि पंतप्रधान मोदींशी संवादाने विश्वजीत भारावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:56 AM2023-11-14T08:56:27+5:302023-11-14T08:56:49+5:30
या संवादाविषयी लगेच गोव्यातील काही मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'इंदौर में क्या चल रहा हैं, क्या स्थिती हैं, आप कितने दिन इधर रुके हो' वगैरे विविध प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना काल विचारले. मोदी यांच्या भेटीने व झालेल्या संवादाने विश्वजीत भारावले. या संवादाविषयी लगेच गोव्यातील काही मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
पंतप्रधान मोदी भाजपच्या निवडणूक सभेसाठी इंदौरमध्ये काल दाखल झाले. पंतप्रधानांचे त्या विमानतळावर स्वागत करण्याची जबाबदारी मंत्री राणे यांच्यावर होती. राणे हे रांगेत पुढेच होते. त्यामुळे मोदी यांनी विमानतळावरून येताना सर्वप्रथम राणे यांच्याकडे जात सविस्तर संवाद साधला. आपण गेले चाळीस दिवस इंदौरमध्येच आहे, असे विश्वजीत यांनी मोदी यांच्या प्रश्नास उत्तर देताना सांगितले.
इंदौरमधील पाच विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी प्रभारी या नात्याने विश्वजीत यांच्यावर आहे. या पाचपैकी चार मतदारसंघात भाजप निश्चितच जिंकत आहे, असा दावा राणे यांनी केला. प्रचाराची माहिती त्यांनी आकडेवारीसह पंतप्रधानांना दिली.
चाळीस दिवस ठोकला तळ....
मोदी यांनी आणखी काही राजकीय प्रश्न विचारले व चाळीस दिवस तळ ठोकून प्रचारकाम केल्याबाबत राणे यांना शाबासकी दिली. राणे यांनी वाकून मोदींना नमस्कार केला तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचे हात हातात घेऊन आपल्या भावना व्यक्त राज केल्या. काम सुरुच ठेवा, असा संदेश पंतप्रधानांनी आपल्याला दिल्याचे राणे यांचे म्हणणे आहे. या भेटीबाबतचे फोटो कालच व्हायरल झाले.