गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; इस्त्रायल आणि केनियातील मिळून दोघींना अटक
By किशोर कुबल | Published: September 9, 2023 12:00 AM2023-09-09T00:00:27+5:302023-09-09T00:01:18+5:30
कारवाईत पाच महिलांची सुटका ; सुधारगृहात रवानगी
पणजी: गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा केनिया आणि भारतादरम्यान कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करीचा पर्दाफाश करून इस्त्रायलमधील एक आणि केनियातील एक मिळून दोन महिलांना अटक केली.
पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी पत्रकारांना सांगितले की, मारिया डोरकास (इस्रायल) आणि विल्किस्टा अचिस्टा (केनिया) या दोन आरोपींना आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले की 'अर्झ' या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने राज्य पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली.
केनिया आणि भारतादरम्यान चालवल्या जाणाऱ्या रॅकेटचा हणजुण पोलिसांनी पर्दाफाश केल्याचे दळवी यांनी सांगितले.
ते म्हणाले की तरुण, शिक्षित केनियन महिलांना गोव्यातील तस्करांच्या वतीने काम करणार्या एजंटांकडून हॉस्पिटॅलिटी उद्योगात नोकरीचे खोटे आश्वासन देऊन गोव्यात आणण्यात आले. व त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले.भारतात आणल्यानंतर, तस्करांनी महिलांचे पासपोर्ट आणि व्हिसा जप्त केले आणि हिंसाचाराच्या भीतीने त्यांना वेश्याव्यवसायात भाग पाडले.'
दळवी म्हणाले की, मारिया डोरकास आणि विल्किस्टा या तस्कर जोडीचा समावेश असलेला हा रॅकेट मोठ्या प्रमाणात ऑनलाइन कार्यरत होता, ग्राहक मिळवण्यासाठी एस्कॉर्ट वेबसाइटची मदत घेतली जात होती.
पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी बेंगळुरूला नेले जात असताना कारवाईची माहिती एनजीओला समजल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे त्यांनी सांगितले. सुटका करण्यात आलेल्या महिलांना मिरची येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.