International Yoga Day 2018 : गोव्यात राज्यपालांच्या उपस्थितीत योगाभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 12:42 PM2018-06-21T12:42:10+5:302018-06-21T12:42:10+5:30
चौथ्या आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त गुरूवारी सकाळी गोव्याच्या विविध भागांमध्ये योगाचे कार्यक्रम पार पडले. हजारो गोमंतकीयांनी योगामध्ये भाग घेतला व आंतरराष्ट्रीय योगा दिनाला प्रतिसाद दिला.
पणजी : चौथ्या आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त गुरूवारी सकाळी गोव्याच्या विविध भागांमध्ये योगाचे कार्यक्रम पार पडले. हजारो गोमंतकीयांनी योगामध्ये भाग घेतला व आंतरराष्ट्रीय योगा दिनाला प्रतिसाद दिला. गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत योगाचा प्रमुख शासकीय सोहळा पार पडला.
गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने क्रिडा व युवा व्यवहार खात्याच्या सहकार्याने योगाच्या मुख्य सोहळ्य़ाचे आयोजन बांबोळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात करण्यात आले होते. राज्यपाल सिन्हा यांनी समई प्रज्वलित करून योगाच्या सोहळ्य़ाचे उद्घाटन केले. राज्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. दळवी तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व सांगितले. सरकारी अधिकारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आदी मिळून शेकडो व्यक्ती ह्या योगा सोहळ्य़ात सहभागी झाल्या. त्यांनी योगाची विविध आसने केली.
गोव्यातील फोंडा, मडगाव, वास्को आदी शहरांमध्येही गुरुवारी योगाचे कार्यक्रम पार पडले. पतंजलीतर्फे फोंडा येथे योगाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर व इतरांनी भाग घेतला. बेतोडा येथील सरकारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनीही योगा सादर केले. गोवा योग अकादमीनेही ताळगावसह अन्य काही भागांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित केले होते. मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. फातोर्डाच्या रविंद्र भवनमध्ये आयुष विभागातर्फे योगा पार पडला. मडगावमध्ये झालेल्या एका योगा कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी भाग घेतला.
गोव्यात पहिल्या व दुस-यावर्षी योगा दिन जास्त मोठय़ा प्रमाणात साजरा झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आदींनी योगामध्ये भाग घेतला होता. यावेळी तसे चित्र दिसले नाही. यावेळी योगाच्या सोहळ्य़ात अतीमहनीय व्यक्ती जास्त आढळून आल्या नाहीत. मात्र राज्यभरातील विद्यार्थ्यांनी योगाला मोठा प्रतिसाद दिला. वेळगे येथील बांदोडकर विद्यालयातही योगा पार पडला. बार्देश, मुरगावसह, सांगे, पेडणो, सत्तरी, डिचोली आदी अनेक ठिकाणी विद्यालयांमध्ये योगा पार पडला. शिक्षण खात्याने योगामध्ये भाग घेण्याची सूचना विद्यालयांना केली होती.