स्मार्ट पणजीतील गटारांमध्ये इंटरनेट केबल्सचे अडथळे; मॉन्सूनपूर्व कामे ठरली फ्लॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 02:47 PM2024-07-09T14:47:11+5:302024-07-09T14:47:19+5:30
महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे पणजीकडे खास लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पणजी: स्मार्ट सिटीच्या बेशिस्त कामांमुळे पणजीत अनेक महत्वाच्या ठिकाणी गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पणजीतील अनेक गटारांमध्ये इंटरनेट सेवा देण्यासाठी वापरण्यात येणारे केबल्स आढळले असून, सदर केबल्स गटारातून पाणी योग्य प्रकारे वाहण्यास अडथळ ठरत आहे. यावरुन महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे पणजीकडे खास लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आल्तीनो येथील वीज खात्याच्या कार्यालयासमोरील गटरांमधून पाणी थेट रस्त्यावर वाहत होते. स्थानिकांच्या तक्रारीनंतर नगरसेवक अस्मीता केरकर यांनी मनपाचे कामगार बोलवून या गटराचे काम हाती घेतले, दरम्यान त्यांना या गटरांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले खासगी इंटरनेेट केबल्स आढळून आले. या केबल्समुळे या गटरात माती व कचरा साचला होता. परीणामस्वरुप गटारातून पाणी थेट रस्त्यावर वाहत होते. केबल्स आढळून येताच केरकर यांनी महापौर रोहीत मोन्सेरात व उपमहापौर संजीव नाईक यांना याची कल्पना दिली.
महपौर रोहीत मोन्सेरात यांनी उपमहापौर संजीव नाईक यांच्यासमवेत या भागाची पाहणी केली. तसेच ज्या गटारांमध्ये असे इंटरनेट केबल्स सापडतात, ते केबल्स थेट काढून बाहेर फेकण्यात यावे, असे आदेश दिला. तसेच इतर गटारांंमधील स्वच्छतेचेे काम त्वरीत हाती घ्यावे, असेही मोन्सेरात यांनी यावेळी कामगारांना बजावले.
मॉन्सूनपूर्व कामे ठरली फ्लॉप
पावसाळी हंगाम सुरु होण्या तीन महिने आधीच महानगरपालीका पणजीतील मॉन्सूनपूर्व कामे हाती घेतात. या अंतर्गत गटारे साफ करणे, धोकादायक झाडे-फांद्या कापणे, नाले साफ करणे, सांतिनेझ खाडी साफ करणे, धोकादायक उघडी गटारे बंद करणे, यासारखी कामे हाती घेण्यात येतात. परंतु रविवारपासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने मॉन्सूनपूर्व कामाचा बोगस कारभार उघड्यावर पाडला आहे. जवळपास सर्व मॉन्सूनपूर्व कामे फ्लॉप ठरली.