सांस्कृतिक धोरणाच्या मंजुरीअभावी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे कला गुण रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 11:49 AM2018-10-06T11:49:07+5:302018-10-06T11:54:25+5:30
गोव्यात इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांच्या धर्तीवर कला गुण देण्याची योजना सांस्कृतिक धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी रखडल्याने अजून मूर्त स्वरुपात येऊ शकलेली नाही.
किशोर कुबल
पणजी - गोव्यात इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांच्या धर्तीवर कला गुण देण्याची योजना सांस्कृतिक धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी रखडल्याने अजून मूर्त स्वरुपात येऊ शकलेली नाही. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी मुलाखतीत हे उघड केले. तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण दिले जातात. त्याच धर्तीवर कला गुण दिले जावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
- परीक्षार्थींना क्रीडा गुणांच्या धर्तीवर कला व सांस्कृतिक गुण देण्याच्या योजनेचे काय झाले? असा प्रश्न केला असता सामंत म्हणाले की, यावर अजून निर्णय झालेला नाही. सांस्कृतिक धोरण तयार झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीची मंजुरी घ्यावी लागेल व त्यानंतरच ते बोर्डाकडे येईल.
- बोर्डाने कोणते नवे उपक्रम हाती घेतले आहेत, असा प्रश्न केला असता सामंत म्हणाले की, दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान किंवा अन्य विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळविले आहेत त्यांनी उत्तरपत्रिका कशा लिहिल्या हे पाहण्याची उत्कंठा परीक्षार्थी किंवा त्यांच्या पालकांमध्येही असते. येत्या २0 ते २५ दिवसात या उत्तरपत्रिका बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जातील. तसेच ज्या शिक्षकांनी बोर्डासाठी पेपर तपासनीस किंवा मॉडरेटर, मुख्य मॉडरेटर म्हणून काम केले आहे त्या शिक्षकांची माहितीही उपलब्ध केली जाईल. जेणेकरुन त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेता येईल.
- पेपर तपासणीची संगणकीय पध्दत बंद का केली? असा प्रश्न केला असता सामंत म्हणाले की, ‘ प्रायोगित तत्त्वावर हे काम हाती घेण्यात आले होते. परंतु संगणकावर उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याच्या कामात बऱ्याच चुका राहू लागल्या त्यामुळे तक्रारीही वाढल्या. त्यामुळे दोन-तीन वर्षांपूर्वीच ही पद्धत बंद केली. सध्या तपासनीस हातानेच पेपर तपासणी करतात. यामुळे भरपूर मनुष्यबळ लागते ही गोष्ट खरी आहे. दहावीच्या प्रत्येक विषयासाठी साधारणपणे ८0 तपासनीस लागतात. बारावीला काही विषय पर्यायी असतात. इंग्रजी या प्रथम भाषेच्या उत्तरपत्रिकांसाठी जास्त तपासनीस लागतात. मराठी किंवा अन्य भाषेसाठी पर्याय असतात त्यामुळे विभागून तपासनीस लागतात.
- फेरमूल्यांकन किंवा फेरतपासणीत गुण वाढण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ही गोष्ट खरी आहे का? या प्रश्नावर सामंत म्हणाले की, ‘फेरमूल्यांकन किंवा फेरतपासणीत गुण वाढण्याचे प्रमाण केवळ २ टक्के एवढे अल्प आहे. याचे कारण आमचे स्क्रुटिनायझर्स असतात ते प्रत्येक उत्तरपत्रिकांची बारकाईने शहानिशा करतात त्यामुळे फारच कमी चुका राहतात.
- गोव्यात दहावी, बारावीसाठी परीक्षार्थींची संख्या वर्षोनवर्षे वाढत चालली आहे, याचे कारण काय? असे विचारले असता सामंत म्हणाले की, ‘गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींचे प्रमाण तुलनेत कमी आहे. दहावीसाठी एरव्ही २0 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी व्हायची यंदा केवळ १८,७५0 परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. बारावीसाठीसाठीही सुमारे १९ हजार विद्यार्थी नोंदणी करीत असत. यंदा फक्त १७,0२५ परीक्षार्थींनी नोंदणी केलेली आहे. शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) सवलतीमुळे इयत्ता आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षात बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यंदा मात्र प्रमाण तुलनेत कमी दिसते.
- बोर्डासाठी नव्या इमारतीचे बांधकाम करण्याच्या योजनेचे काय झाले? या प्रश्नावर सामंत म्हणाले की, ‘पर्वरी येथे बोर्डाच्या सध्याच्या इमारतीशेजारीच सुमारे ८000 चौरस मिटर जागेत बांधण्यात येणार असलेल्या या इमारतीसाठी साधन सुविधा विकास महामंडळ लवकरच निविदा काढणार आहे. २५ कोटी रुपये खर्चुन ही इमारत बांधण्यात येत असून सर्व अद्ययावत सोयी-सुविधा या इमारतीत असतील. पेपर तपासणीसाठी मोठा हॉल, परिषदगृह व इतर गोष्टी असतील.