बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे कोकण-गोव्याच्या निर्यातीस मिळणार चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 03:49 PM2018-01-19T15:49:05+5:302018-01-19T15:51:55+5:30
कोकण रेल्वेच्या बहुचर्चित बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे गोव्याहून महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे गोव्यातील निर्यातदारांचा विशेषत: मत्स्य उत्पादक व निर्यातदारांचा मोठा फायदा होणार असून हे पार्क मार्च पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती
- नारायण जाधव
मडगांव - कोकण रेल्वेच्या बहुचर्चित बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे गोव्याहून महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे गोव्यातील निर्यातदारांचा विशेषत: मत्स्य उत्पादक व निर्यातदारांचा मोठा फायदा होणार असून हे पार्क मार्च पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी येथे पत्रकारांना दिली. कोकण रेल्वेच्या विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कारवार विभागाचे महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ सुलेमान, मुख्य जनसंपर्क अधिकारी एल के वर्मा, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर उपस्थित होते.
सध्या गोव्यातून रोज ५० कंटेनर नवी मुंबईतील जेएनपीटी बंदराकडे जातात. यांत मोठ्या प्रमाणातील मत्स्य उत्पाजनांचा समावेश आहे. मात्र रस्ते वाहतुकीत अनेक धोके आहेत. शिवाय वाहतूक खर्चही जास्त येतो. तसेच मोठा वेळही खर्च होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊनच हे पार्क विकसित करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला. कारण सध्या गोव्यात जी बंदरे आहेत. तिथे कार्गो वाहतुकीची सोय नाही. केवळ बल्क जेटी आहेत. त्यामुळे गोव्यातील निर्यातदारांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. परंतु आता बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे त्यांची गैरसोय दूर होऊन गोव्यातील निर्यातवाढीला मदत होणार आहे. विशेष म्हणजे या पार्कच्या ठिकाणीच कस्टम किलअरन्सची सोय करण्यात येणार असल्याने जेएनपीटीत त्यासाठी होणारी फरफट कायमची दूर होणार असल्याचे गुप्ता म्हणाले. तसेच जेएनपीटी पर्यंतची कंटेनर वाहतूक सोपी व सोयीची व्हावी यासाठी कंटेनर कार्पोर्शन आॅफ इंडिया सोबत कोकण रेल्वेने खास करार केला आहे. यानुसार त्यांनी ४३ कोटींची गुंतवणूक केली आहे. यांत ते देशी व विदेशी कंटेनर वाहतूक करणार आहेत. त्यांच्याकडून भाड्यापोटी कोकण रेल्वेस दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे.
विद्युतीकरणामुळे वार्षिक १०० कोटींची बचत
केंद्र सरकारच्या एकात्मिक रेल्वे मार्ग विद्युतीकरण कार्यक्रमा नुसार ७४० किमी लांबीच्या कोकण रेल्वे मार्गावर ९७० किमी लांबीच्या रूळांवर विद्युतीकरण करण्यात येत आहे. यामुळे सध्या डिझेल लोकोवर जो २५० ते ३०० कोटींचा खर्च विद्युतीकरणामुळे तब्बल १०० कोटींनी कमी होणार आहे. या बचतीतून अन्य विकास कामे करणे शक्य होणार असल्याचे संजीव गुप्ता यांनी सांगितले.