भारतीय उद्योग महासंघांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकांमधून इन्व्हेस्ट गोवा २०२४ ला गती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:33 PM2024-01-20T12:33:48+5:302024-01-20T12:33:57+5:30

शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची राज्याने तयारी केली आहे

Invest Goa 2024 accelerated through high-level meetings with Indian industry federations | भारतीय उद्योग महासंघांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकांमधून इन्व्हेस्ट गोवा २०२४ ला गती

भारतीय उद्योग महासंघांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकांमधून इन्व्हेस्ट गोवा २०२४ ला गती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: इन्व्हेस्ट गोवा २०२४च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी भारतीय उद्योग महासंघांच्या (सीआयआय) मुंबई कार्यालयात उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन केले. या बैठकांमधील चर्चेतून आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला चालना देणारे अनुकूल वातावरण निर्मितीबाबत भूमिका मांडण्यात आली. या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची राज्याने तयारी केली आहे. गोव्यात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी या बैठकीत प्रयत्न करण्यात आले.  

यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी नेदरलँडचे काउन्सुल जनरल, फिनलंडचे काउन्सुल जनरल आणि यूएईचे कॉन्सुल जनरल यांच्याशी रचनात्मक चर्चा केली. या चर्चांमधून गोवा आणि या राष्ट्रांमधील धोरणात्मक सहकार्याचा पाया घातला गेला. बैठकांमध्ये राज्यामधील व्यापार, गुंतवणुकीच्या संधी आणि द्विपक्षीय सहकार्याचे मार्ग यासह विविध विषयांचा समावेश होता. आर्थिक व व्यावसायिक गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र म्हणून गोवा राज्याचे महत्व वाढत असल्याबाबत सहमती व्यक्त करत ​​काउन्सुल जनरलनी गोव्यासोबत भागीदारीच्या संधी शोधण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली.

मंत्री गुदिन्हो यांनी उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांचीही भेट घेतली. यामध्ये ऑलकार्गो टर्मिनल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश कुमार आर, केमट्रोल्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. नंदकुमार, मास्टेकचे अध्यक्ष अशांक देसाई, इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंटचे सीईओ धिमंत बक्षी; हिंदुजा रिन्युएबल्सचे सीईओ सुमित पांड्ये; शॅलेट हॉटेल्सचे सीईओ संजय सेठी आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे राकेश स्वामी आदींचा समावेश होता.

चर्चेत महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. बैठकांदरम्यान अनेक प्रमुख संस्थांनी गोव्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्याबाबत आपले स्वारस्य व्यक्त केले. केमट्रोल्स इंडस्ट्रीजने गोव्यामध्ये 'वेस्ट टु एनर्जी' प्रकल्प उभारण्याची संधी शोधत असल्याचे सांगितले. तर इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंटने गोव्यातील पर्यटकांसाठी पर्यटन व मनोरंजनाचा अनोखा आनंद देण्यासाठी 'एंटरटेनमेंट पार्क' उभारण्याबाबतचे स्वारस्य त्यांनी व्यक्त केले. हिंदुजा रिन्युएबल एनर्जीने तरंगते सौरप्रकल्प उभारण्याबाबत आणि त्यांच्या सौरऊर्जा उद्योगाचा विस्तार करण्याचे नियोजन सादर केले. याशिवाय, शॅलेट हॉटेल्सद्वारे १५० खोल्यांच्या क्षमतेसह परिषद केंद्र उभारण्याचा धाडसी प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. गोदरेज समुहाने तेलताड उत्पादनावर लक्ष केंद्रित करणारे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची तयारी दर्शवली अशी माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: Invest Goa 2024 accelerated through high-level meetings with Indian industry federations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा