गोव्यात होणार इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन
By समीर नाईक | Published: January 20, 2024 04:44 PM2024-01-20T16:44:14+5:302024-01-20T16:51:48+5:30
२९ जानेवारी २०२४ रोजी “इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद”चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
समीर नाईक, पणजी: राज्यात नवीन आर्थिक व व्यावसायिक गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी)च्या वतीने राष्ट्रीय भागीदार म्हणून भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्या सहकार्याने २९ जानेवारी २०२४ रोजी “इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद”चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री गुदिन्हो यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्य-आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक आणि सीआयआय पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष स्वाती साळगावकर यांची उपस्थिती होती.
राज्यातील विकासाच्या व उद्योगातील संधींचा लाभ घेण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना संवाद साधण्यासाठी, विचारमंथन करण्यासाठी आणि आघाडीच्या सर्वोत्तम पद्धतींवर विचारविनिमय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. या शिखर परिषदेत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रमुख सरकारी अधिकारी, विचारवंत, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आणि इतर प्रतिष्ठित भागधारकांचा सहभाग असेल, असे गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.
या परिषदेमध्ये आयडीसीतर्फे राज्यात व्यवसायसुलभता वाढवण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण आणि गोव्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योगांना विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. असे रेजिनाल्ड यांनी यावेळी सांगितले.
इन्व्हेस्ट गोवा २०२४ या शिखर परिषदेत उद्योगक्षेत्र निहाय सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये लॉजिस्टिक आणि वखारसुविधा क्षेत्रासाठी 'शाश्वत विकासासाठी लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंगमध्ये धोरणात्मक गुंतवणुकीला प्रोत्साहन' या संकल्पनेवर एक सत्र; माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाधारित सेवा (आयटी-आयटीईएस) क्षेत्राबाबत 'तांत्रिक परिवर्तन: डिजिटल भविष्याच्या दिशेने' या संकल्पनेवर आधारित सत्र आणि 'शाश्वत विकासासाठी जागतिक सहयोग: सहयोगात्मक विकास' या संक्लपनेवरील राष्ट्रीय सत्र यांचा समावेश असेल, असेही रेजिनाल्ड यांनी पुढे सांगितले.
इन्व्हेस्ट गोवा २०२४ सारख्या उपक्रम आयोजनाच्या माध्यमातून गोवा राज्याला रोजगार, आर्थिक उलाढाल,स्टार्ट अप, प्रदूषण मुक्त उद्योग या सारखे विविध फायदे मिळणार आहेत, असेही ते म्हणाले.