त्या स्कॅण्डलची चौकशी कराच; मुख्यमंत्र्यांना सत्य बाहेर आणण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:15 AM2023-09-06T09:15:18+5:302023-09-06T09:16:13+5:30
खुर्चीवरून खाली उतरा चौकशीला सामोरे जा: तारा
पणजी : सेक्स स्कॅण्डलची मुळापासून चौकशी कराच, असे आव्हान प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.
काही विरोधक आपला आवाज क्लोन करून बोगस ऑडिओ क्लिप बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर गिरीश यांनी वरील विधान केले आहे.
गिरीश यांनीच कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरण 'एक्स'वर पोस्ट करून उघडकीस आणले होते. मंत्री माविन यांच्या कार्यालयाने त्यानंतर वास्को पोलिसात तक्रारही केली होती.
चोडणकर म्हणाले की, 'सेक्स स्कँडलमध्ये कोण मंत्री गुंतला आहे, हे शोधणे पोलिसांचे काम होय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन सत्य काय ते उघडकीस आणावे. मी गृहमंत्री असतो, तर दोन दिवसांत प्रकरण धसास लावले असते. राज्य सरकार याबाबतीत उदासीनता दाखवत आहे.'
चोडणकर म्हणाले की, मंत्र्यांची कांडे बाहेर काढण्यासाठी कोणाचीही फूस असण्याची गरज नाही. सत्ताधाऱ्यांकडून ज्या काही गैर गोष्टी घडतात, त्या उघडकीस आणून, त्यावर आवाज उठविणे विरोधक म्हणून आमचे कर्तव्य आहे.'
माविन यांनी असेही म्हटले होते की, आपल्या कार्यालयातून पोलिसात तक्रार केली, परंतु काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. गिरीश यांना याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, 'माविन सरकारात मंत्री आहेत. मग चौकशी करायला विलंब का? मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन सत्य काय ते लोकांसमोर आणावेच, असेही चोडणकर यांनी सांगितले. दरम्यान, या कथित सेक्स स्कँडलमुळे राज्याचे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे.
खुर्चीवरून खाली उतरा चौकशीला सामोरे जा: तारा
मला पोलिस स्थानकात न्या. मंत्र्याच्या सर्व भानगडी पोलिसांना सांगण्याची माझी तयारी आहे,' असे जाहीर विधान केलेल्या 'सवेरा' एनजीओच्या निमंत्रक तारा केरकर यांनीही मंत्री माविन गुदिन्हो यांना आव्हान दिले आहे. खुर्चीवरून खाली उतरा आणि चौकशीला सामोरे जा, असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, या प्रकरणात मुख्यमंत्री व सभापती यांच्याकडे मी सर्वप्रथम तक्रार केलेली आहे. सोशल मीडियावर टाकलेले फोटो मॉर्फ केलेले आहेत, हे मंत्र्यांनी सिद्ध करावे. या आधी मिलिंद नाईक, मिकी पाशेको यांचे अशाच प्रकरणांमध्ये राजीनामे घेतले. मग माविन यांनाच अभय का? असा सवाल केला. या प्रकरणी आवाज उठविण्याचे काम चालूच ठेवू, असे त्या म्हणाल्या.