दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आदींच्या हत्यांचा तपास केवळ राजकीय हेतूने - डॉ. अमित थडानी
By आप्पा बुवा | Published: June 18, 2023 06:52 PM2023-06-18T18:52:20+5:302023-06-18T18:52:40+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या नास्तिकवादी तथा शहरी नक्षलवादाशी संबंधितांच्या हत्यांच्या तपासामध्ये राजकारण चालू आहे
फोंडा : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या नास्तिकवादी तथा शहरी नक्षलवादाशी संबंधितांच्या हत्यांच्या तपासामध्ये राजकारण चालू आहे. ठोस पुरावे नसतांना हिंदुत्वनिष्ठांना आरोपी बनवून तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले. मात्र नंतर तपास यंत्रणांनीच हत्येमागे अटक केलेल्या आरोपींच्या ऐवजी नवीनच आरोपी असल्याचा दावा केला. एकूणच या सर्व प्रकरणांमध्ये सतत आरोपी बदलणे, शस्त्रे बदलणे, असे बेकायदेशीर प्रकार झाले.
डॉ. दाभोलकर खटल्यात तुकडे तुकडे करून समुद्रात फेकलेले पिस्तुल शोधून काढल्याचा दावा करण्यात आला.मात्र समुद्रातून ते त्यांना अखंड स्थितीत मिळाले ! मग खोल समुद्रात त्या पिस्तुलाची जोडणी कोणी केली? एकूणच या हत्या कुणी केल्या आणि का केल्या, याचा तपास यंत्रणांनी कधीच प्रामाणिकपणे शोध घेतलाच नाही. केवळ या हत्यांचा राजकीय लाभासाठी कसा उपयोग होईल, हेच पाहिले गेले, असे प्रतिपादन ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.
या प्रसंगी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ? हा प्रश्न का विचारला जात नाही ? साम्यवाद्यांनी जगभरात 10 कोटी लोकांच्या हत्या केल्या असून, नक्षलवाद्यांनी 14 हजारांहून अधिक हत्या केल्या आहेत. नक्षलवादी हेच साम्यवादी आहेत आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत; मात्र हे कुणी सांगत नाही. हाच वैचारिक आतंकवाद आहे. त्यामुळे वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे .’’
अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती म्हणाले, ‘‘मी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेच्या विरोधातील खटला लढत आहे. त्यामुळे मला धमक्या देण्यात आल्या, इतकेच नाही तर माझ्यावर प्राणघातक आक्रमणही झाले; मात्र श्रीकृष्णाचे स्मरण करत असल्याने त्यातून माझे संरक्षण झाले. त्यामुळे समाजातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनीही जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा नामस्मरण करावे.’’ या प्रसंगी अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी धर्मासाठी बलिदान देणार्यांचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन केले.