विद्यापीठ लैंगिक छळ प्रकरणी 'त्या' रंगेल पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू
By वासुदेव.पागी | Published: September 7, 2023 05:42 PM2023-09-07T17:42:09+5:302023-09-07T17:42:45+5:30
गोवा राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाचा तपासानेही वेग घेतला.
पणजी: दोन विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार नोंदविल्यानंतरही इतके दिवस गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत तपास समितीला ठेंगा देत फिरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्धचा तपास अहवाल गोवा विद्यापीठाकडून पोलीस मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे.
या अहवालानंतर पोलीस मुख्यालयातूनही त्या अधिकाऱ्याच्या खात्यांतर्गत चौकशीचा आदेश जारी झाला आहे.इंटर्नशीप करण्यासाठी मुख्यालयात आलेल्या गोवा विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार गोवा विद्यापीठात नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीवर चौकसी न करता हे प्रकरण तसेच पडून राहिले होते. संशयित अधिकारी तपासाला सहकार्य करीत नाही हे कारण देऊन तपास पुढे सरकत नव्हता. मात्र गोवा विद्यापीठातील आणखी एका लैंगिक अत्याचार प्रकरणात प्राध्यापकाचे कारनामे उघडकीस आल्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्याचेही भांडे फुटले आहे.
गोवा राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाचा तपासानेही वेग घेतला. विद्यापीठाच्या अंतर्गत चौकसी समितीपुढे तो अधिकारी चौकशीसाठी हजर राहिला. परंतु आपल्या विरुद्धचे आरोप त्याने फेटाळले आहेत. दरम्यान या समितीने चौकशी अहवाल पूर्ण करून तो गोवा पोलीस मुख्यालयाला सादर केला आहे. या संदर्भात गोवा विद्यापीठाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी म्हटले आहे.
चौकशी समिती नियुक्त
या प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्याच्या नेतृत्वाखाली चौकसी समिती नियुत्त करण्यात आली आहे. ही समिती या प्रकरणात तपास करून लवकरच अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करणार आहे. त्यानंतरच त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.