२६.८५ लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय प्रकरणी चौकशी सुरू आहे: मंत्री गोविंद गावडे
By समीर नाईक | Published: February 2, 2024 03:54 PM2024-02-02T15:54:53+5:302024-02-02T15:55:08+5:30
आम्ही खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे, लवकरच जे काही तथ्य आहे ते समोर येणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.
पणजी : अनेक संस्थांनी कला आणि संस्कृतीच्या २६.८५ लाख रुपयांच्या निधीचा अपव्ययचा आरोप काणकोण, खोतीगाव येथील सरपंच आणि काही पंच सदस्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे, लवकरच जे काही तथ्य आहे ते समोर येणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.
कला व संस्कृती खात्यातर्फे उगाच कुणालाही पैसे देण्यात येत नाही. संस्थांनी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घडवून आणल्यास कार्यक्रमाचा पुरावा घेऊनच पैसे दिले जातात. पैसे देण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. तरीही आम्ही चौकशी सुरू केली आहे. जर कार्यक्रम न करता पैसे घेतल्याचे आढळून आल्यास ही रक्कम वसूल केली जाईल, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.
काणकोण येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, उपसरपंच पुनम गावकर, पंच कृष्णा गावकर, जयेश वेळीप, वृंदा वेळीप, श्रीस्थल पंचायतीच्या सरपंच सेजल गावकर, सदस्य गणेश गावकर, नीलेश गावकर आदींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. अक्षदा वेळीप, गावडोंगरी पंचायतीचे प्रभाकर गावकर, विनिता गावकर आदींनी सदर आरोप केला होता.