लुटारू रेस्टॉरंट्सची वाणिज्य कर खात्याकडून तपासणी, मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 09:33 PM2017-11-28T21:33:01+5:302017-11-28T21:33:10+5:30
जीएसटीचे प्रमाण 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आलेले असले तरी, देखील जी रेस्टॉरंट्स याबाबतचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवत नाहीत, उलट ग्राहकांना लुटतात अशा रेस्टॉरंट्सची तपासणी करण्याची मोहीम सरकारच्या वाणिज्य कर खात्याने मंगळवारपासून सुरू केली आहे.
पणजी : जीएसटीचे प्रमाण 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आलेले असले तरी, देखील जी रेस्टॉरंट्स याबाबतचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवत नाहीत, उलट ग्राहकांना लुटतात अशा रेस्टॉरंट्सची तपासणी करण्याची मोहीम सरकारच्या वाणिज्य कर खात्याने मंगळवारपासून सुरू केली आहे.
अनेक रेस्टॉरंट्सनी 18 टक्के जीएसटी लागू झाल्यानंतर आपल्या अन्न पदार्थाची मूळ रक्कमही वाढवली. त्यामुळे रेस्टॉरंट्समध्ये जेवण महागले. लोकांना रेस्टॉरंटमध्ये बसणो तसेच जेवण करणो आणि अन्य खाद्य पदार्थ खाणो परवडेनासे झाले. पाण्याच्या बाटल्या, शितपेये यावरील रक्कम देखील वाढवली गेली. पणजीसह राज्यातील सर्व मोठ्या शहारांमध्ये हाच अनुभव ग्राहकांना येत आहे. सर्वबाजूंनी काही रेस्टॉरंट्स ग्राहकांची लुट करतात अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या. वाणिज्य कर खात्याने याची दखल घेऊन तपासणी मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे.
राज्यातील एकूण 300 रेस्टॉरंट्सची निवड वाणिज्य कर खात्याने तपासणीसाठी केलेली आहे. ही तीनशे रेस्टॉरंट्स 5 टक्के जीएसटी लागू करतात की नाही तसेच त्यांच्या पदार्थाची मूळ रक्कम किती आहे वगैरे तपासणी कर खात्याच्या अधिका-यांकडून केली जाणार आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये मोठय़ा प्रमाणात ग्राहक जातात व जिथे मोठय़ा प्रमाणात उलाढाल होते, अशीच तीनशे रेस्टॉरंट्स निवडण्यात आली आहेत.
छोटय़ा रेस्टॉरंटची तपासणी करून पाहण्याचा तूर्त प्रस्ताव नाही, असे एका अधिका-याने सांगितले. रेस्टॉरंट्सकडून ग्राहकांना लाभ पोहचता केला जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारींची दखल आम्ही घेऊन मोहीम सुरू केली आहे. जे दोषी आढळतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिका-यांनी सांगितले. 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत जीएसटीचे प्रमाण खाली आल्याने पाच टक्के प्रमाण लागू करणे बंधनकारक आहे. काही रेस्टॉरंट्स बिलांमध्ये वाट्टेल तसे दर लावतात. पर्यटकांनाही त्यामुळे गोव्यातील रेस्टॉरंट्समध्ये खाणेपिणे नकोसे होते. काही रेस्टॉरंटमध्ये पूर्वी 120 रुपयांना जेवणाचे ताट मिळत होते. ते आता दोनशे रुपये करण्यात आले आहे. काही रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे ताट 160 रुपये मिळत होते, तो दर 220 रुपये असा करण्यात आला आहे.