आयपीएल स्टार राहुल त्रिपाठी यंदा गोव्याकडून रणजी खेळणार
By समीर नाईक | Published: August 19, 2023 03:26 PM2023-08-19T15:26:05+5:302023-08-19T15:27:14+5:30
गोवा क्रिकेट संघटनेने (जीसीए) यंदाच्या मोसमात अर्जुन तेंडुलकर तसेच कर्नाटकचा रोहन कदम व के. व्ही. सिद्धार्थ यांची प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून निवड जाहीर केली होती.
पणजी: यंदाच्या २०२३- २४ रणजी हंगामात प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून महाराष्ट्राचा आयपीएल स्टार राहुल त्रिपाठी गोव्याच्या संघाकडून खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा क्रिकेट संघटनेने (जीसीए) यंदाच्या मोसमात अर्जुन तेंडुलकर तसेच कर्नाटकचा रोहन कदम व के. व्ही. सिद्धार्थ यांची प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून निवड जाहीर केली होती.
जीसीएने आणखी एक-दोन प्रोफेशनल क्रिकेटपटूंची निवड जीसीए करणार असल्याचे संकेतही दिले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्राचा स्फोटक फलंदाज राहुल त्रिपाठी याला गोव्याच्या रणजी संघात प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून आता स्थान देण्यात आले आहे. सध्या त्रिपाठी पुडुचेरीत सराव सत्रात गोव्याच्या संभाव्य रणजी संघात दाखल झाला आहे.
राहुल त्रिपाठी हा रोहन कदमच्या स्थानी संघात असणार आहे. के. व्ही. सिद्धार्थने नुकत्याच झालेल्या केपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपली उपयुक्तता दाखविली आहे. राहुल त्रिपाठी आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करण्यात माहीर असून त्याने ८९ आयपीएल सामन्यांतून ११ अर्धशतकांनी २०७१ धावा केल्या आहेत. याचवर्षी जानेवारीमध्ये श्रीलंके विरुध्द भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी त्याने ५ टी-२० क्रिकेट सामने खेळले असून एकूण ९८ धावा केल्या आहेत.
आयपीएल फ्रँचायज सनरायझर्स हैदराबादने ८.५० कोटी रुपये मोजून त्रिपाठीला आपल्या संघात घेतले हाेते. राहुल त्रिपाठीच्या उपस्थितीत गोवा संघ चांगली कामगीरी करणार आहे, अशी आशा जीसीएकडून व्यक्त करण्यात येत आहे.