आयरिश स्टार फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यूज FC गोव्याच्या ताफ्यात
By समीर नाईक | Updated: August 22, 2023 17:37 IST2023-08-22T17:36:21+5:302023-08-22T17:37:33+5:30
एफसी गोवा क्लबने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे.

आयरिश स्टार फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यूज FC गोव्याच्या ताफ्यात
पणजी : आयरिश येथील स्टार फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यूज याला एफसी गोवाने आगामी दोन हंगामासाठी करारबद्ध केले आहे. या करारानुसार ३० वर्षीय कार्ल २०२३-२५ या हंगामात ऑरेंज जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आयएसएल विजेत्या दोन क्लबकडून खेळलेल्या मॅकह्यूज याच्याकडे भारतीय फुटबॉलमधील दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे एफसी गोवा क्लबने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे.
रॉलिन बोर्जेस, उदांता सिंग, संदेश झिंगान, बोरिस सिंग, रेनियर फर्नांडिस, पाउलो रेट्रे, कार्लोस मार्टिनेझ, ओडेई ओनाइंडिया आणि व्हिक्टर रॉड्रिग्ज यांच्यानंतर एटीके आणि मोहन बागान सुपर जायंट फुटबॉलपटू मॅकह्यूज हा यंदाच्या हंगामात एफसी गाेवाच्या ताफ्यात दाखल झालेला दहावा खेळाडू आहे. एफसी गोवा क्लबचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे आणि या संधीचे साेने करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेन. एफसी गोवा हा एक प्रतिष्ठित क्लब आहे. त्यामुळे या क्लबकडून खेळताना निश्चितच आनंद येईल, असे कार्ल मॅकह्यूज याने एफसी गोवा सोबतच्या करारानंतर सांगितले.
आमच्या संघात कार्ल हा एक नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. तो असा खेळाडू आहे जो आमच्या मिडफिल्डमध्ये आवश्यक गुणवत्ता जोडतो आणि तो एक अष्टपैलू खेळाडूदेखील आहे. त्याचा स्पर्धात्मक स्वभाव आणि विजयी मानसिकता आमच्या ड्रेसिंग रूममध्ये महत्त्वाची भर घालेल. मला खात्री आहे की कार्लचा स्पर्धात्मक स्वभाव आणि जिंकण्याची मानसिकता गोव्याच्या चाहत्यांना आवडेल, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुष्कर यांनी सांगितले.