गोविंद गावडे पुन्हा टार्गेट? विरोधकांकडून आरोपांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2024 09:34 AM2024-02-03T09:34:50+5:302024-02-03T09:36:00+5:30

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्ली भेटीवर असताना आणि गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू झालेले असतानाच ही आरोपबाजी सुरू झाली आहे. 

is govind gawade target again | गोविंद गावडे पुन्हा टार्गेट? विरोधकांकडून आरोपांची आतषबाजी

गोविंद गावडे पुन्हा टार्गेट? विरोधकांकडून आरोपांची आतषबाजी

एखाद्या मंत्र्याने किंवा मंत्र्याच्या खात्याने समजा घोटाळा केला असेल तर त्याबाबत रीतसर तक्रार करायला हवी. विरोधी आमदार असो, सभापती असो किंवा अन्य कोणत्याही पदावरील नेता असो, तो जेव्हा थेट मंत्र्यावर किंवा खात्यावर गंभीर आरोप करतो तेव्हा त्याने अगोदर तक्रार करणे गरजेचे असते. मग ती तक्रार मुख्यमंत्र्यांकडे, दक्षता खात्याकडे किंवा लोकायुक्तांकडेही करता येते; मात्र तक्रार न करताच मीडियामधून काहीजण आरोपांची आतषबाजी करतात तेव्हा केवळ बदनामी करणे एवढाच हेतू आहे की काय, असा संशय कुणाच्याही मनात येऊ शकतो. मंत्री गोविंद गावडे व सभापती रमेश तवडकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोप किंवा टीकासत्रामुळे पूर्ण भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्ली भेटीवर असताना आणि गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू झालेले असतानाच ही आरोपबाजी सुरू झाली आहे. 

अधिवेशन काळातच गोविंद गावडे यांची कोंडी करण्याचे ठरवून मीडियामधून नेत्यांनी जे आरोप सुरू केले आहेत, ते पाहता भाजप हा आता बेशिस्तीचे जाहीर प्रदर्शन करू लागलाय, हे कळून येते. मध्यंतरी अशा प्रकारचे वाद आणखी काही नेत्यांमध्ये व्हायचे. मात्र, सभापतिपदावरील नेता आणि मंत्रिपदावरील नेता यांच्यात अधिवेशन काळातच जाहीर वाद होण्याची ही पहिलीच वेळ असावी. मुख्यमंत्री सावंत यांना भेटून तवडकर यांनी तक्रार केली असती व पुरावेही सादर केले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते.

आमचा पक्ष खूप वेगळा आहे, आमच्या पक्षात काँग्रेससारखे मंत्री-आमदार एकमेकांविरुद्ध भांडत नाहीत, असे भाजपकडून अनेकदा विरोधकांना सांगितले जाते. मात्र, आता जनतेच्या डोळ्यांदेखत जे वस्त्रहरण सुरू झाले आहे ते पाहता भाजपलाही धक्का बसेलच. जे काम विरोधी आमदारांनी करायला हवे ते काम सध्या भाजप नेतेच करू लागले आहेत, मंत्र्यांची त्यामुळे अधिक मानसिक कोंडी होत आहे, हेही नमूद करावे लागेल. 

कला संस्कृती खाते दरवर्षीं राज्यभरातील कार्यक्रमांसाठी अर्थसाहाय्य देत असते. गोव्यातील कला आणि संस्कृतीच्या संवर्धनात या खात्याचे योगदान मोठे आहे. गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेतही या खात्याची कामगिरी सरस आहे. अगदी दिगंबर कामत कला संस्कृती खाते सांभाळत होते. त्यावेळीही गोव्यात कार्यक्रम खूप व्हायचे, आताही प्रत्येक गावात या खात्याच्या सहकार्याने कार्यक्रम होत असतात. अनेक संस्था त्यासाठी अनुदान, अर्थसाह्य मिळवतात. अनेक कलाकारांना मानधनही मिळते. खरे म्हणजे कला संस्कृती खात्याचे अर्थसाह्य हा वादाचा विषय ठरू नये; पण तवडकर किंवा अन्य नेते म्हणतात त्यानुसार जर खरोखर खोतीगाव पंचायत क्षेत्रात कुणी कार्यक्रम करण्याच्या नावाखाली पैसे लाटले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी. एकाच घरात स्थापन करण्यात आलेल्या दोन- दोन संस्थांना कला संस्कृती खात्याने अनुदान दिले, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. २६ लाख ८५ हजार रुपयांची खिरापत विविध प्रकारे वाटण्यात आली, असेही आरोप करणाऱ्यांना वाटते, एखाद्या तटस्थ यंत्रणेने जर या आरोपांची चौकशी केली तर बरे होईल; मात्र त्यासाठी अगोदर संबंधितांनी रीतसर तक्रार करायला हवी.

तवडकर यांनी केलेल्या आरोपातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले आहे. विधानसभा अधिवेशनात येत्या आठवड्यात हा विषय माजेल. मंत्री गावडे यांनी मीडियाला सांगितले की घोटाळा झालेला नाही. आपल्याविरोधातील आरोपाचे टायमिंग पाहता, ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे मंत्री गावडे यांना वाटते. अर्थात, त्यांनी यापूर्वीही अनेक वाद झेलले आहेत. काहीवेळा ते विरोधकांना पुरूनही उरले आहेत. कधी कला अकादमीच्या विषयावरून तर कधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धावरून गावडे यांना घेरण्याचा प्रयत्न पूर्वी अनेकांनी केला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे होते, गावडे यांच्या क्रीडा खात्याने ते यशस्वीपणे उचलले, तवडकर व गोविंद गावडे यांच्यातील संघर्ष नवीन नाही. उटाशी निगडित काही सदस्यांनाही ते ठाऊक आहे; मात्र आता झालेले आरोप अधिक गंभीर आहेत. गावडे यांना मुद्दाम टार्गेट केले जाते, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. अर्थात, मुख्यमंत्री सावंतच याबाबत काय ते स्पष्टीकरण करून आरोपांबाबत चौकशीचा आदेशही देऊ शकतात.
 

Web Title: is govind gawade target again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा