...खरेच दक्षिणेत जिंकणे कठीण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 08:43 AM2023-11-19T08:43:44+5:302023-11-19T08:45:43+5:30

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचा मार्ग सोपा नाही, असे काही मंत्रीही खासगीत सांगतात. काब्राल तर उघड बोलले आहेत.

is it really hard to win in the south goa in lok sabha election 2024 | ...खरेच दक्षिणेत जिंकणे कठीण?

...खरेच दक्षिणेत जिंकणे कठीण?

- सद्गुरू पाटील

विधानसभा निवडणुकीवेळी प्रत्येक मंत्री, आमदार किंवा उमेदवार स्वत: जिंकायला हवे म्हणून प्रचंड कष्ट घेतात. पैसे खर्च करतात. लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात तसे घडत नाही. यावेळी दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघात भाजपचा मार्ग सोपा नाही, असे काही मंत्रीही खासगीत सांगतात. काब्राल तर उघड बोलले आहेत.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काही दिवसांपूर्वी पणजीत सर्व सताधारी आमदार व भाजप-मगोपचे मंत्री यांची संयुक्त बैठक घेतली होती. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने जिंकायलाच हवे असे लक्ष्य चंद्रशेखर यांना ठरवून दिले गेले आहे. ४९ वर्षीय राजीव चंद्रशेखर हे उद्योजक, टेक्नोक्रेट आहेत. ते केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाचे मंत्री आहेत. कौशल्य विकास मंत्रालयही त्यांच्याकडे आहेच. दक्षिण गोव्याची जागा भाजपने जिंकावी म्हणून योग्य ती फिल्डींग लावण्याचे कौशल्य चंद्रशेखर यांच्याकडे आहे का. हे तपासून पाहावे लागेल.

पणजीतील बैठकीवेळी मंत्री नीलेश काब्राल एकटेच यासंदर्भात स्पष्टपणे बोलले. कुडचडेचे आमदार असलेले काब्राल म्हणाले की भाजपला दक्षिण गोव्यात जिंकणे सोपे नाही, त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. भाजप जिंकणारच नाही असे काब्राल यांनी म्हटलेले नाही. जास्त कष्ट घ्यावे लागतील, हे त्यांनी अधोरेखित केले आहे. नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा किंवा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांना वाटते की दक्षिणेतील खिस्ती मते मिळविण्यासाठी वेगळे काही तरी करावे लागेल. आपल्या नवे मतदारसंघात भाजपला कधी जास्त मते मिळत नाहीत. यावेळीही मिळणार नाहीत, पण गेल्यावेळी मिळाली त्यापेक्षा जास्त मते कमळाला मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू, असे सिक्वेरा यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा व लोकसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात भाजपची सध्याची सर्वात बळकट व जमेची बाजू अशी की. दक्षिण गोव्यातलेही बहुतांश आमदार भाजपसोबत आहेत. दिगंबर कामत, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, संकल्प आमोणकर, कावाल, रमेश तबडकर वगैरे आहेतच, शिवाय माजीमंत्री बाबू कवळेकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड डाळीचे आंतोन वाज गोपचे नेते सुदिन ढवळीकर हेही यावेळी भाजपसोबत आहेत. बाबू तर भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी स्वतः तिकीटावर दावाही केला आहे. गेल्यावेळी फ्रान्सिस सार्दिन निवडून आले व खासदार झाले, त्यात बाबू कवळेकर व सुदिन ढवळीकर यांच्या कामाचा मोठा वाटा होता. कवळेकर हे तर त्यावेळी रात्री एक वाजेपर्यंत लोकांसोबत प्रचार बैठका घेत असायचे आणि सार्दिन त्यावेळी आपल्या घरी झोपलेले असायचे, आता पुन्हा हेच सार्दिन काँग्रेसकडे तिकीट मागतात हा मोठा विनोदच आहे. ७७ वर्षीय सार्दिन यांना रिटायर करण्याची वेळ आलीय हे वेगळे सांगायला नको. 

राजीव चंद्रशेखर यांना दक्षिण गोवा मतदारसंघातील राजकारण आता थोडेफार कळलेले असेल. भाजपमध्ये तिकीटाचे तीन दावेदार आहेत. मात्र गोव्यातील काही मंत्री हळूच दिगंबर कामत यांचे नाव पुढे करतात. कामत यांना भाजपचे तिकीट देऊया व दिल्लीत पाठवूया, असे काही मंत्र्यांनी राजीव चंद्रशेखर यांना व गृहमंत्री शहा यांनादेखील सूचवले आहे.  भाजपने एकेकाळी रमाकांत आंगले (सारस्वत) यांना दक्षिणेत निवडून आणले होते. यावेळी कामत यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. कामत गोव्याच्या राजकारणात राहिले तर ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होतील, त्यामुळे त्यांना खासदार केलेले बरे असा धूर्त विचार काही मंत्री करतात. कदाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही विचार तसाच असावा, असे जाणवते. विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांचे वैशिष्ट्य असे की ते शेवटपर्यंत आपल्या मनाच्या तळात लपलेली खरी गोष्ट कोणत्याच जवळच्या व्यक्तीला सांगत नाहीत. ते थेट हायकमांडलाच काय ती आपली मन की बात सांगतात. तरीही राजीव चंद्रशेखर यांच्याशी मुख्यमंत्री काही गोष्टी बोलले आहेत. त्यामुळेच कदाचित येत्या महिन्यात गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना होऊ शकते.

राजीव चंद्रशेखर हे उच्चशिक्षित आहेत. गोव्याचे मंत्री विश्वजित राणे, रोहन खंवटे यांनीही चंद्रशेखर यांना भेटून काही गोष्टी सांगितल्या असल्याची माहिती मिळते. दक्षिणेत भाजपने योग्य उमेदवार निवडणे हे आव्हानात्मक काम आहे. काँग्रेस पक्ष कोणत्या धर्माचा, जातीचा उमेदवार उभा करील याचा विचार करून मग भाजप आपले तिकीट निश्चित करील अशी माहिती मिळते. शेवटी जिंकणे हाच निकष आहे. राजीव चंद्रशेखर यांनी दक्षिण गोव्यातील पूर्वीचा मतदान ट्रेंड, आकडेवारी, भाजपची बलस्थाने, कमकुवत बाजू, धर्मनिहाय मतदानाचे प्रमाण वगैरे गोष्टींचा अभ्यास केलाय असे काही मंत्र्यांना वाटते. 

चंद्रशेखर तेवढे स्मार्ट नक्कीच आहेत. राजीव यांचे वडील एम. के. चंद्रशेखर भारतीय हवाई दलात एकेकाळी एअर कमोडोर होते. त्यांनी काँग्रेसचे (नंतरचे नेते राजेश पायलट यांना प्रशिक्षण दिले होते. राजीवजींचा जन्म अहमदाबादमध्ये मल्याळी कुटुंबात झाला, पण त्यांचे वडिलोपार्जित मूळ घर केरळमध्ये आहे.
इंग्रजीवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व आहे. हे वेगळे सांगायला नको. शिकागोमधून त्यांनी संगणक विज्ञान विषयात मास्टर्स डिग्री घेतलेली आहे. एवढ्यावरुनही त्यांचा प्रोफाईल कळून येतो. इंटेल कंपनीत त्यांनी एकेकाळी काम केलेय. एकेकाळी त्यांनी बीपीएल मोबाईल कंपनीची स्थापना केली होती.

सावंत मंत्रिमंडळात काय चाललेय, दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती व हिंदू आमदारांची मानसिकता कशी आहे याचा एव्हाना त्यांना बराच अंदाज आला असेल, भाजपला यावेळी दक्षिण गोव्यात अल्पसंख्यांकांची मते मिळणार नाहीत असे कुणीच समजू नये, योग्य उमेदवार दिला तर खिस्ती व मुस्लिम मते भाजपला मिळू शकतील. आता भाजपकडे स्वर्गीय मनोहर पर्रीकर नाहीत. आता प्रमोद सावंत आहेत. सावंत उत्तर गोव्यात जेवढे लोकप्रिय आहेत, तेवढे दक्षिणेत नाहीत. आणि ख्रिस्ती मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव खूप कमी आहे, हेही मान्य करावे लागेल. आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत अशा काही नेत्यांचा प्रभाव
स्वतःच्या मतदारसंघापलिकडे नाही. तरी देखील भाजपचे संघटनात्मक बळ, कार्यकत्यांचे नेटवर्क हे दक्षिण गोव्यात देखील प्रभावी आहे. काँग्रेस पेक्षा दक्षिण
गोव्यात भाजपचे अस्तित्व, कार्यकर्त्यांची संख्या व प्रभाव वाढला आहे. अल्पसंख्यांक मते ही कॉंग्रेसची जमेची बाजू आहे. गिरीश चोडणकर व एल्वीस गोम्स या दोन नेत्यांपैकी एकाला काँग्रेसचे तिकीट मिळेल. एल्वीसपेक्षा गिरीश प्रभावी आहेत, राजकीयदृष्ट्या हुशार, धूर्त व धाडसीही आहेत. समजा गिरीशला काँग्रेसने दक्षिणेत तिकीट दिले तर भाजपला घाम येऊ शकतो. ही गोष्ट नाकारता येत नाही. हिंदू बहुजन मतदारावर छाप टाकण्याचे कसब एल्वीसपेक्षा गिरीशकडे आहे. अर्थात एल्वीसच्या स्वतः च्या काही मजबूत बाजू आहेत, पण तेवढे पुरेसे ठरत नाही.

विधानसभा निवडणुकीत काब्राल कुडचडेत कसेबसे जिंकले. यावेळी काब्राल यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्याजागी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिले जाईल. तसे दिल्लीत ठरले आहे. अलिकडेच काब्राल यांनी दिल्लीवारी केली आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी माहिती मिळते. दिगंबर कामत यांना जर लोकसभेचे तिकीट भाजप देणार नसेल तर त्यांना मंत्रिपद दिले जाईल. संकल्प आमोणकर यांचादेखील मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.


 

Web Title: is it really hard to win in the south goa in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.