आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2024 10:10 AM2024-04-01T10:10:09+5:302024-04-01T10:12:01+5:30
आर.जी. वर पूर्वीसारखा लोकांचा विश्वास अजून राहिला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच मिळू शकेल.
प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा पहिल्यांदाच लढवण्यास सज्ज झालेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) च्या लोकसभेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. लोकसभेच्या जागेसाठी तिरंगी लढत अपेक्षित असून रिंगणातील इतर पक्षांच्या तुलनेत आर.जी. ने सर्वात प्रथम आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले; पण आर.जी. वर पूर्वीसारखा लोकांचा विश्वास अजून राहिला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच मिळू शकेल.
विधानसभा निवडणुकीपासून आर.जी. लक्षवेधी कामगिरीतून चर्चेत आला होता. पूर्ण गोव्यातून त्यांनी ३९ जागा लढवल्या होत्या; तर उत्तर गोव्यातून हळदोणा मतदारसंघ वगळता इतर १९ मतदारसंघांतून आपले उमेद्वार रिंगणात उतरवले होते. त्यांना या मतदार संघातून ४८,७२७ मते प्राप्त झाली होती. काही मतदारसंघांत तर त्यांचे उमेदवार मातब्बर उमेदवारांच्या पराभवाचे कारण बनले होते. काही मतदारसंघातून झालेल्या मतविभागणीचा लाभही विजयी ठरलेल्या उमेदवाराला झाला होता. बऱ्याच मतदारसंघांतून लक्षवेधी कामगिरी करीत धक्कादायक निकाल आर.जी.च्या उमेदवारामुळे काही मतदारसंघांतून लागले होते. विधानसभेवेळी प्राप्त मते टिकवून ठेवून त्याहून सरस लक्षवेधी कामगिरी कशी करणार याकडे लक्ष लागले आहे.
विधानसभेदरम्यान थिवी मतदारसंघातून आर.जी.चे तत्कालीन उमेदवार मनोज परब यांना ४९५९ मते प्राप्त झालेली. त्यांना मिळालेल्या मतामुळे तृणमूलच्या उमेदवाराचा पराभव होण्यास ते कारण बनले होते. म्हापशातून आर.जी.ला १४७६ मते मिळाली होती. शिवोली मतदारसंघात ३१३४ मते साळगावांत मते, मये मतदारसंघात ३९३३ मते, साखळी मतदारसंघात ७४० मते मिळवून केलेल्या कामगिरीतून स्वतःकडे लक्ष वेधून घेतले होते.