'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:33 AM2023-06-14T08:33:42+5:302023-06-14T08:34:39+5:30
बसेस बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या काही महिन्यांपासून कदंब महामंडळाच्या बसेस भर रस्त्यातच बंद होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यातून महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बसेस बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महामंडळ यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्याऐवजी विषय टाळण्यातच येत आहे. कदंब महामंडळ हे सरकारचे सर्वात जुने महामंडळ आहे. गाव, शहर याने जोडले जात आहे; परंतु गेल्या काही वर्षात हळूहळू कदंब बसेसचा दर्जा खालावल्याचेही चित्र आहे. अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या आहेत ज्यामुळे शंका निर्माण होते.
शालेय बसेस बंद
गावात, शहरांमध्ये सेवा देणाऱ्या बसेस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकार समोर आले आहेच; परंतु गेल्या काही काळात शालेय मुलांना ये-जा करणाऱ्या कदंब गाड्याही बंद पडल्या होत्या. त्यानंतर दुरुस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याचा त्रास मात्र विद्यार्थी, पालकांना झाला.
महामंडळाकडे ५०० जुन्या गाड्या
इलेक्ट्रिक बसेसचा काळ सुरु असताना कदंब महामंडळ अद्याप इतरांच्या तुलनेत खूप मागे आहे. त्यांच्याकडे सुमारे ५०० जुन्या कदंब बसेस आहे, तर १५० इलेक्ट्रिक बसेस आहेत. अजून काही नवीन इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा महामंडळाचा विचार आहे; पण याला अजून किती वेळ लागणार हे सांगता येत नाही.
दरवर्षी ३० बसेस होणार स्क्रॅप
केंद्र सरकारची नवी स्क्रॅप पॉलिसी कदंब महामंडळाला अडथळा ठरणार असल्याचे चित्र आहे. स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करावी लागत आहे. या अनुषंगाने कदंबच्या प्रत्येक वर्षाला सुमारे ३० बसेस स्क्रॅप होणार आहेत.
कदंब बसेसने पूर्वी प्रवास सुखकर व्हायचा; पण आता तसे होत नाही. अनेकदा बसेस भर रस्त्यात बंद पडतात, तसेच लोकांना पर्यायी बसेस पोहोचविण्यास महामंडळ अपयशी ठरले आहे.- रक्षंदा ठाकूर, प्रवासी, म्हापसा
कदंब महामंडळ देखरेखीच्या बाबतीत खूप मागे आहे. काही बसेसमध्ये बसायला व्यवस्थित आसनव्यवस्थादेखील नाही. तसेच चालकही आपल्याच धुंदीत वाहन चालवत असतात. - जगदीश कारापूरकर, प्रवासी, वास्को