'इंडिया' आघाडीत फूट? 'विजय संवाद' ठरला वादाचा मुद्दा; काँग्रेसमध्ये मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 08:47 AM2024-08-12T08:47:16+5:302024-08-12T08:48:18+5:30
पुढील तीन वर्षे सर्व मतदारसंघ पालथे घालणार
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांची 'विजय संवाद' मोहीम इंडिया आघाडीमध्ये वादाचा विषय ठरली. खुद्द काँग्रेसमध्येच या मुद्द्यावरून दोन गट पडले.
सरदेसाई यांनी राज्यातील सर्व चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी मोहीम उघडली आहे. काल, रविवारी कुडचडे येथे सरदेसाई यांनी 'संडे डायलॉग' हा जनसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, त्यावरून वाद निर्माण झाला. कॉग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. विजय यांच्या 'संडे डायलॉग' यामागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस मरिना रिबेलो यांनी केला. तर दुसरीकडे मात्र विजय हे हृदयाने कॉग्रेसजनच असल्याचे व त्याचा फायदा 'इंडिया' आघाडीला निश्चितच होणार असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस रिबेलो यांचे असे म्हणणे आहे की, 'सरदेसाई यांनी कुडचडे येथील संडे डायलॉगबद्दल कोणतीही माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना दिली नाही. कॉग्रेसचे राज्यातील सर्व ४० ही मतदारसंघांमध्ये अस्तित्व आहे.' त्यांच्या या विधानामुळे गोव्यातील इंडिया अलायन्समध्ये फूट पडली का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कवठणकर यांचे असे म्हणणे आहे की, 'विरोधी आमदारापैकी सरदेसाई हे सर्वात अनुभवी, तसेच वरिष्ठ आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशानात त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांची कामगिरी उत्तम होती. सरदेसाई यांच्या 'संडे डायलॉग' मुळे उलट इंडिया आघाडीला भ्रष्ट भाजपचा पराभव करण्यासाठी मजबुती मिळेल.'
पुढील तीन वर्षे सर्व मतदारसंघ पालथे घालणार
विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'माझ्या संडे डायलॉगवर प्रश्न उपस्थित करणारे मोरेना कोण?' असा उलट सवाल केला. ते म्हणाले की, विजय म्हणाले की, मी आमदार आणि एका राजकीय पक्षाचा अध्यक्षदेखील आहे. राज्यभरातील जनतेपर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा असे मला वाटले तर त्यात काही गैर नाही आणि कोणीही वाईट वाटून घेण्याचे कारणही नाही. जनता दरबार घ्या, अशी विनंती कुडचडेंतील लोकांकडूनच आली होती.
लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही फिरायचो, तेव्हा लोक समस्या मांडायचे. मलाही लोकांना भेटण्याची इच्छा आहे. पुढील तीन वर्षे मी प्रत्येक मतदारसंघात फिरणार आहे. मये किंवा अन्य काही मोठ्या मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त संडे डायलॉग घ्यावे लागतील, तेदेखील घेईन. कुडचडेला लोक आग्रहास्तव जनसंवादाचा कार्यक्रम मी आयोजित केला. हा पक्षाचा कार्यक्रम नव्हे. खुद्द काँग्रेस नगरसेवकानेही बोलावले होते.