माणसांच्या जीवाला, इथे मोल नाही का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 08:42 AM2023-08-02T08:42:56+5:302023-08-02T08:43:13+5:30
या पापाचे प्रायश्चित्त खरे म्हणजे संबंधित सरकारी यंत्रणेनेच घ्यायला हवे. होय, हे पापच आहे.
सांगे येथील पुलावरून एक कार सोमवारी रात्री नदीत कोसळली. त्यात महिलेसह तिच्या दोन वर्षीय तान्हुल्याचा बळी गेला. अत्यंत हृदयद्रावक, मनाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे तरी गोवा सरकारच्या यंत्रणेला जाग यायला हवी. सरकारी यंत्रणांचे काळीज जेव्हा दगडाचे होऊन जाते तेव्हा गरिबांनाच फुकट मरावे लागते. महिला, तिचा पती आणि मूल असा तिघांचा जीव गेला. या पापाचे प्रायश्चित्त खरे म्हणजे संबंधित सरकारी यंत्रणेनेच घ्यायला हवे. होय, हे पापच आहे.
ही घटना मानवनिर्मित मानून संबंधित यंत्रणेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करायला हवा होता. तारीपाटो येथे पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे नाहीत, ते कठडे असते तर कदाचित कार खाली पडली नसती. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी नदीच्या ठिकाणी आजूबाजूचे काही दिसत नाही. कधी झाडी वाढलेली असते, तर बहुतेकदा पुलावर किंवा रस्त्याकडेला दिवाबत्तीची सोय नसते. खांबांवरील वीजदिवे पेटत नाहीत. गोव्यातील ग्रामीण भागात मुक्तीनंतरच्या साठ वर्षांत देखील अशीच स्थिती आहे. काणकोण, केपे, सांगे व सत्तरी तालुक्यांतील काही गावांतील लोकांना अजूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. काणकोणमधील एका गावातील लोकांना साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे असेल तर ३२ किलोमीटर चालावे लागते. मुलांना शाळेत जाण्यासाठीही अनेक किलोमीटर चालावे लागते.
सांगेसह अनेक तालुक्यांतील छोट्या पुलांना कठडे नाहीत, रस्त्यांवर वीजदिव्यांची सोय नाही. सर्वच राज्यकर्त्यांना या स्थितीची लाज वाटायला हवी. शेकडो कोटी रुपयांची सोहळ्यांवर उधळपट्टी करणाऱ्या सावंत सरकारने तारीपांटो येथील त्या दुर्दैवी पुलावर आता तरी तातडीने कठड्यांची व्यवस्था करावी. मंत्र्यांसाठी लाखो रुपयांच्या कार खरेदी करणाऱ्या सरकारने तसेच आमदारांचे वेतन वाढवा, अशी मागणी करणाऱ्या दिगंबर कामत यांच्यासारख्या नेत्याने सांगेतील या दुर्दैवी घटनेसाठी डोळ्यांतून दोन अश्रू ढाळले तर बरे होईल.
कुमयामळ सांगे येथे राहणाऱ्या नाईक कुटुंबाचा सोमवारच्या अपघाताने बळी घेतला. रात्री आठच्या सुमारास या कुटुंबाची कार पुलावरून नदीत गेली. त्यात पती, पत्नी व लहान मूल असा तिघांचा जीव गेला.
गोव्यात अशा घटना सहसा घडत नाहीत. महाराष्ट्र व अन्य मोठ्या राज्यांतील गरीब व मागास जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात. सांगेतील घटनेने गोव्यातील संवेदनशील लोकांचे काळीज खरोखर हलले. सोमवारी पहिल्या रात्री आई व मुलाचा मृतदेह मिळाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी मुलाचे वडील मिलिंद नाईक यांचा मृतदेह सापडला. अरेरे, असे व्हायला नको होते, अशी प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त झाली. घरी राहिलेली मुलगी वाचली. असा मृत्यू कुणाच्याच वाट्याला येऊ नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने जागे होण्याची वेळ आली आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना पुलासाठी संरक्षक कठड्याची तातडीने सोय करावी लागेल. मुख्यमंत्री सावंत यांनी किंवा सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पोर्तुगीजकालीन खुणा पुसण्याच्या मागे नंतर लागावे, अगोदर लोकांचे जीव वाचविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभ्या केल्या तर गोव्यावर उपकार होतील.
हळदोणा मतदारसंघातील कालवी येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटनेची आठवण काल अनेकांना झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी बस नदीत पडून सहा जणांचा बळी गेला होता. त्यात आठ ते दहा वर्षांच्या चार विद्यार्थिनी होत्या. पूर्ण गोवा हादरला होता. त्यावेळी जनभावना एवढी संतप्त होती की, आमदार दयानंद नार्वेकर यांचा २०१२च्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर नार्वेकर पुन्हा विधानसभेत पोहोचलेच नाहीत, हा वेगळा मुद्दा. गोव्यातील सर्व छोट्या व मोठ्या पुलांचे सर्वेक्षण करून कठडे उभारण्याचे काम आता तरी बांधकाम खात्याने करावे. कमकुवत झालेले कठडे नव्याने बांधून द्यावे.