तुमची गाडी ८ वर्षे जुनी आहे? फिटनेस टेस्ट बंधनकारक; सर्वच वाहनांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:47 PM2023-02-15T13:47:13+5:302023-02-15T13:47:40+5:30
वाहनाची खरेदी केल्यानंतर पहिल्या ८ वर्षांत प्रत्येक दोन वर्षांच्या अंतराने ही फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: खासगी वाहनांच्या तुलनेत व्यावसायिक वाहनांचा वापर जास्त प्रमाणावर होत असतो. त्यामुळे अशा वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या पद्धतीने प्रवास मिळावा तसेच वाहनातून होणारे प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने अशा वाहनांना फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
वाहनाची खरेदी केल्यानंतर पहिल्या ८ वर्षांत प्रत्येक दोन वर्षांच्या अंतराने ही फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानंतर दरवर्षी ही टेस्ट करवून घेणे गरजेचे करण्यात आले आहे. वाहनधारकांमध्येही जागरुकता आली असून बार्देश तालुक्यात दररोज सरासरी १५ वाहनांची फिटनेस चाचणी केली जात असल्याचे दिसून येते.
दररोज होते टेस्ट
बार्देश तालुक्यासाठी म्हापशात असलेल्या वाहतूक खात्याच्या उपविभागीय कार्यालयात दर दिवशी सरासरीवर १५ वाहनांची फिटनेस चाचणी घेतली जाते. यात सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.
व्यावसायिक वापरासाठी सक्ती
वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहनाचा वापर व्यावसायिक कारणास्तव केला जात असल्यास पहिल्या ८ वर्षांत दर दोन वर्षांनी फिटनेस टेस्ट गरजेची आहे. तशी सक्ती वाहनचालकांना करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येकवर्षी ही चाचणी करवून घेणे गरजेचे आहे.
वाहनचालकाला मिळतो दाखला
वाहनाला दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मान्यताप्राप्त गॅरेजमधून ही चाचणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर मुदतीपूर्व वाहतूक कार्यालयात योग्य शुल्क जमा केल्यानंतर फिटनेस करावी लागते. चाचणी तेथील निरीक्षकामार्फत केल्यानंतर
वाहनचालकाला दाखला दिला जातो.
तर अर्ज नामंजूर
बऱ्याचवेळा वाहनांची योग्य पद्धतीने दुरुस्ती केली जात नाही. अशावेळी फिटनेससाठी केलेला अर्ज नामंजूर होण्याची शक्यता असते. अर्ज नामंजूर झाल्यास दुरुस्ती पुन्हा करवून पुन्हा फिटनेससाठी अर्ज करावा लागतो.
सर्वच वाहनांचा समावेश
- यामध्ये चाकी वाहन, रिक्षा, चारचाकी, बस ट्रकसारख्या वाहनांचा समावेश होतो. ही टेस्ट मान्यताप्राप्त गॅरेजमध्ये करणे गरजेचे आहे.
- केलेल्या टेस्टनंतर वाहतूक कार्यालयात योग्य प्रमाणावर शुल्क जमा करून नंतर फिटनेस चाचणी करणे गरजेचे आहे.
दरवर्षी चाचणी करावी लागते
८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी चाचणी करावी लागते. केलेल्या अर्जानंतर कार्यालयातील निरीक्षक वाहनाची तपासणी केल्यावर योग्य तो निर्णय घेतात. - मिनेष तार, उपसंचालक, बार्देश
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"