गोव्याच्या उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:23 PM2019-07-24T17:23:14+5:302019-07-24T17:26:18+5:30

गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी काणकोण मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांची निवड झाल्यात जमा आहे.

Isidore Fernandes likely to be new deputy speaker | गोव्याच्या उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडिस

गोव्याच्या उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडिस

googlenewsNext
ठळक मुद्देगोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी काणकोण मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांची निवड झाल्यात जमा आहे.भाजपातर्फे फर्नांडिस यांनी एकट्यानेच उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. इजिदोर फर्नांडिस हे कधीच उपसभापती किंवा सभापती झाले नाहीत.

पणजी - गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी काणकोण मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांची निवड झाल्यात जमा आहे. भाजपातर्फे फर्नांडिस यांनी एकट्यानेच उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या नावाची घोषणा गुरुवारी (25 जुलै) होणार आहे. 

गोव्यातील नव्या सत्ता नाटय़ानंतर मायकल लोबो यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला व ते मंत्री बनले. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने भाजपाने उपसभापतीपद स्वीकारण्यास प्रथम नीळकंठ हळर्णकर यांना सांगितले होते. मात्र हळर्णकर यांना ते पद नको. त्यामुळे फर्नांडिस यांना विनंती केली गेली. त्यांनी उपसभापतीपद स्वीकारणे मान्य केले. इजिदोर फर्नांडिस हे कधीच उपसभापती किंवा सभापती झाले नाहीत. त्यांना अल्पसा काळ मंत्री म्हणून लाभला होता. गोवा औद्योगिक विकास महामंडळाचेही ते एकदा चेअरमन झाले होते. फर्नांडिस यांना आता प्रथमच उपसभापतीपद प्राप्त झाले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या कुठच्याच आमदाराने उमेदवारी अर्ज भरला नाही किंवा गोवा फॉरवर्ड पक्षाच्याही आमदाराने उमेदवारी सादर केली नाही. यामुळे फर्नांडिस हे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. सभापती राजेश पाटणेकर गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा करतील असे अपेक्षित आहे. उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास बुधवारी (24 जुलै) मुदत होती.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडी सरकारकडे एकूण 29 आमदारांचे संख्याबळ आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत फक्त अकराजणच विरोधी बाकांवर आहेत. त्या अकरापैकी दोन जणांची भूमिका तटस्थच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांचीही काँग्रेसला साथ नाही. काँग्रेसमधील दहा आमदार अलिकडेच फुटून भाजपामध्ये आले आहेत. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम बनले आहे. सभापतीपदासाठी यापूर्वी सुभाष शिरोडकर यांचे नाव भाजपाने विचारात घेतले होते पण शिरोडकर यांनी नकार दिल्याने मग पाटणेकर यांची त्या पदी निवड झाली. नवे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना सरकार एका महामंडळाचेही चेअरमनपद देणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

 

Web Title: Isidore Fernandes likely to be new deputy speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.