इस्राईल देणार गोव्यातील शेतक-यांना सेंंद्रीय शेतीचे धडे,राज्यात विशेष केंद्र उघडण्यासाठी बोलणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 01:24 PM2017-12-21T13:24:10+5:302017-12-21T16:12:53+5:30
सेंंद्रीय शेतीबाबत शेतक-यांना धडे मिळावेत, त्यांनी शेती-बागायतीचे उत्पन्न वाढवावे यासाठी इस्रायली कंपनीला गोव्यात विशेष केंद्र उघडण्यास सांगितले जाईल.
पणजी : सेंंद्रीय शेतीबाबत शेतक-यांना धडे मिळावेत, त्यांनी शेती-बागायतीचे उत्पन्न वाढवावे यासाठी इस्रायली कंपनीला राज्यात विशेष केंद्र उघडण्यास सांगितले जाईल. त्यादृष्टीने कंपनीच्या अधिका-यांशी सरकारची बोलणी चालू आहेत. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, फुलोत्पादन वसाहत उभारण्यासाठी सांगे तालुक्यातील रिवण येथे वन क्षेत्राची २00 हेक्टर जमीन कृषी खात्याला मिळणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही जमीन फ्लोरिकल्चर इस्टेटसाठी मिळवून देण्याबाबत गंभीर आहेत. पुण्याजवळ तळेगांव येथे अशीच पुष्पोत्पादन वसाहत उभरण्यात आलेली आहे. आता तेथून थायलँडला आर्किड फुले निर्यात केली जातात. आर्किड फुलांची शेती करण्यास गोव्यातही मोठा वाव आहे. सेंद्रीय शेतीबाबत इस्राईलकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे.
अधिक माहितीनुसार गुजरात, हरियाणामध्ये या कंपनीने यशस्वी प्रयोग करुन दाखवले आहेत. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात भारत-इस्राईल यांचा संयुक्त कृषी प्रकल्प आलेला आहे. देशभरात सध्या असे २६ संयुक्त प्रकल्प आहेत. टॉमेटो, काकडी, मिरची, हिरवी ढब्बू मिरची आदी पिक प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून वर्षभर घेतले जाते. हायटेक पॉलिहाऊसमध्ये तसेच नैसर्गिक खेळती हवा असलेल्या पॉलिहाऊसमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पीक घेतले जाते. बिगरहंगामी लागवडीसाठी ठिबक सिंचनाचे अद्ययावत तंत्रज्ञानही कंपनीकडे आहे. हरयानात २ हजारहून अधिक शेतक-यांनी याचा लाभ घेतलेला आहे.
इस्राईलच्या या कंपनीचे अधिकारी सध्या गोवा भेटीवर आहेत. पुढील दोन दिवस कृषीमंत्री सरदेसाई हे या अधिका-यांशी बोलणी करतील. या केंद्रासाठी सरकार कंपनीला जागा उपलब्ध करणार आहे. दरम्यान, राज्यात शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणल्याने उत्पादनात आणि पर्यायाने उत्पन्नात वाढ होत आहे. यंत्रे खरेदीसाठी सरकारकडून भरघोस अनुदान मिळते. जमिनीची नांगरणी, फवारणी, कापणी, भात मळणी अशी बरीचशी कामे आता यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. अनेक शेतक-यांनी आपणहून पुढे येऊन शेती व्यवसायात यांत्रिकीकरण आणले. अनुदान मिळत असल्याने शेतक-यांनी यांत्रिकीकरणाची कास धरली असून येत्या वर्षीही मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण होणार आहे. नवनवीन पिकांच्या जाती विकसित झाल्यामुळे जेथे दर हेक्टरमागे केवळ एक ते दीड टन उत्पन्न येत असे, तेथे आता १५ ते २० टन उत्पन्न मिळते.
महाराष्ट्राचे ‘कर्जत-७’ तसेच केरळच्या लाल दाण्याच्या ‘रेवती’ या भातबियाण्यांना गोव्याची हवा मानवल्याने या बियाण्यांचा खरिप व रबी मोसमात व्यापक वापर केला जात आहे. बंगळूरच्या संकरित मिरची बियाण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने या मिरचीचे अधिकाधिक पिक घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. एरव्ही शेजारी बेळगांवहून मिरची आयात केली जात होती. आता गोव्याहून कर्नाटकात ती निर्यात केली जाते, असा दावा फलोत्पादन महामंडळाकडून वेळोवेळी केला जात आहे. स्थानिक भाजी उत्पादकांना संकरित भाजी बियाणी उपलब्ध करुन दिली जात आहेत.