इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. मथवराज यांचा सन्मान; पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:31 PM2023-12-14T15:31:06+5:302023-12-14T15:31:22+5:30
पाचव्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात इस्रोचे युवा वैज्ञानिक डॉ. मथवराज यांना पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त दोनापावला येथील एनआयओ सभागृहात आयोजित पाचव्या मनोहर पर्रीकरविज्ञान महोत्सवात इस्रोचे युवा वैज्ञानिक डॉ. मथवराज यांना पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे, इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ, मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार निवड समितीचे प्रमुख, वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, लेव्हिनसन मार्टिन्स व अन्य मान्यवर व्यासपीठावर हजर होते. चंद्रयान-३ मिशनसाठी महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल डॉ. मथवराज यांची पुरस्कारासाठी निवड केली होती.
मंत्री विश्वजित राणे म्हणाले की, 'गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचे समाजासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने युवा पिढीने त्याचा वापर करावा. यासाठी त्यांनी पुढे यावे. तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या क्षेत्रात वापर होत आहे. थेट चंद्रावर भारताचे चंद्रयान उतरले ही देशासाठी फारच अभिमानास्पद बाब आहे. देशाला याचा गर्व आहे. विज्ञानाचे शाश्वत विकास साधण्यातही मोठे योगदान आहे असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडीओ संदेशद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. 'तरुण वैज्ञानिक तयार व्हावेत या उद्देशाने राज्य सरकार उच्च माध्यमिक पातळीवर योजना राबवत आहे. अशी योजना राबविणारे गोवा पहिले राज्य आहे' असे ते म्हणाले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ व डॉ. अनिल काकोडकर यांनी मार्गदर्शन केले.