गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:27 PM2018-11-01T12:27:35+5:302018-11-01T12:29:33+5:30
पर्रिकर आजारी असूनही सकारात्मक आहेत व काँग्रेसने केलेल्या जोरदार टीकेमुळे त्यांनी घरी बैठका घेणे पसंत केले, अशी चर्चा मंत्र्यांमध्ये आहे.
गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मंदावला
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आजारपणातही त्यांच्या निवासस्थानी बैठका घेणे सुरू केल्यामुळे सरकारमधील नेतृत्व बदलाचा विषय तूर्त मंदावला आहे. नेतृत्व कुणाकडे सोपवावे याविषयी एकमत होत नसल्याने मंत्र्यांनीही तूर्त प्रयत्न थांबवले आहेत.
पर्रिकर यांची सद्याची स्थिती पाहता सरकारमध्ये एक दिवस नेतृत्व बदल करावा लागेल याची कल्पना भाजपला आणि बहुतेक मंत्र्यांनाही आहे. पर्रिकर आजारी असूनही सकारात्मक आहेत व काँग्रेसने केलेल्या जोरदार टीकेमुळे त्यांनी घरी बैठका घेणे पसंत केले, अशी चर्चा मंत्र्यांमध्ये आहे. पर्रिकर यांच्या निवासस्थानी तीन महिन्यांनंतर प्रथमच बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली. पर्रिकर यांना जे मंत्री यापूर्वी भेटू शकत नव्हते, ते मंत्री पर्रिकरांना या बैठकीमुळे भेटू शकले. पर्रिकर बोलतात, सूचना करतात पण त्यांची कार्यक्षमता खूप मर्यादित झालेली आहे. पर्रिकर यांच्याकडे अतिरिक्त खाती यावेळी कुणा मंत्र्याने मागितली नाही. अगोदर अतिरिक्त खात्यांची मागणी मंत्री विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर आदी करत होते. यापुढील काळात जो नवा मुख्यमंत्री येईल, तोच सगळे खाते वाटप नव्याने करील.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे गोव्यातील स्थितीवर लक्ष आहे, असे एका मंत्र्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. पर्रिकर हेच आमचे नेते आहेत व त्यांच्याविषयी आम्हाला पूर्ण आदरही आहे पण प्रशासनाला गती देण्यासाठी पर्यायी नेता यापुढे निवडावा लागेल, असे हे मंत्री म्हणाले.
दरम्यान, सभापती तथा साखळीचे आमदार प्रमोद सावंत हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांचे नाव संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असल्याची भाजपच्या गोटात चर्चा आहे. मुख्यमंत्री तूर्त बैठका घेत असल्याने आपण नेता बदलाचा आग्रह जाहीरपणे नको अशी भूमिका काही मंत्र्यांनी व आमदारांनीही घेतली आहे. एका मंत्र्याला आपणच मुख्यमंत्री बनेन असे वाटते. पण पर्रिकर त्या मंत्र्याच्या नावाला अनुकूल नाहीत. शिवाय सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांना नाव मान्य झाल्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व नवा नेता जाहीर करणार नाही. मंत्री विजय सरदेसाई यांनी तर, भविष्यात नेतृत्व बदलाचा विषय आला तर सरकारच्या घटक पक्षांना कुणी गृहित धरू नये, असा इशारा अगोदरच देऊन ठेवला आहे.