नोकऱ्यांचा विषय ठरला नाजूक..!

By admin | Published: February 10, 2017 01:21 AM2017-02-10T01:21:08+5:302017-02-10T01:23:34+5:30

आम्ही अनेक रोजगार संधी निर्माण करत आहोत. तरीही विधानसभा निवडणुकीत मला, पर्यायाने माझ्या पक्षासमोर सरकारी

The issue of jobs was delicate ..! | नोकऱ्यांचा विषय ठरला नाजूक..!

नोकऱ्यांचा विषय ठरला नाजूक..!

Next

पणजी
आम्ही अनेक रोजगार संधी निर्माण करत आहोत. तरीही विधानसभा निवडणुकीत मला, पर्यायाने माझ्या पक्षासमोर
सरकारी नोकऱ्यांबाबतचा विषय वारंवार उपस्थित झाला. प्रत्येकाला सरकारी
नोकरी मिळू शकत नाही. तथापि, सरकारी नोकरी मिळावी अशीच धारणा बहुतेकांची असल्याचे प्रचारावेळी दिसून आले, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रथमच गुरुवारी पार्सेकर विविध मुद्द्यांबाबत बोलले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत पुढीलप्रमाणे :
? मांद्रे मतदारसंघातील निवडणूक तुम्हाला कशी गेली?
२०१२ साली मांद्रे मतदारसंघात मला जेवढ्या मतांची आघाडी मिळाली होती, तेवढीच या वेळीही मिळेल. मी सहज जिंकेन. प्रसारमाध्यमांना वस्तुस्थिती कळालेली नाही, त्यामुळे माझा पराभव होतोय अशी हवा तयार केली गेली. २०१२ सालीही माझ्या विरोधातील उमेदवाराने स्वत:चा विजय निश्चित मानून बेळगावचे बँड वगैरे निकालाच्या दिवशी तयार ठेवले होते. शिवाय इसवणाच्या शेकडो कापांचीही आॅर्डर दिली होती; मात्र विजय माझाच झाला. या वेळी मांद्रे मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत १३०० ज्यादा महिलांनी मतदान केले आहे. महिला व युवकांचे मतदान हे मांद्रे मतदारसंघातही भाजपसाठीच झालेले आहे. मगोपने उमेदवार उभा केला, तरी तो नावापुरता ठरला. निवडणूक प्रचारावेळी कोणते मुद्दे प्रामुख्याने महत्त्वाचे किंवा अडचणीचे ठरले?
उत्तर : मांद्रे मतदारसंघात आणि इतरत्रही सरकारी नोकऱ्यांची अपेक्षा धरणारे अनेकजण भेटले. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. तथापि, एखाद्या घरात नोकरी दिल्यानंतर दुसऱ्या घरातील व्यक्ती आपल्याला नोकरी का मिळाली नाही असे विचारते, असा अनुभव आला. रोजगार संधी आम्ही मोठ्या प्रमाणात तयार करत आहोत. युवकांची अपेक्षा सरकारी नोकऱ्यांची आहे. सरकारी नोकऱ्या निर्मितीलाही मर्यादा असते.
प्रश्न : महिलांचे वाढीव मतदान हे भाजपलाच झाले, असे तुम्हाला खरोखर वाटते का?
उत्तर : ४० टक्के महिला आमच्यासोबत पूर्वी होत्याच. ६० टक्के महिला विरोधकांकडे असायच्या. तथापि, गृह आधार आणि अन्य कल्याणकारी योजनांमुळे दर महिन्याला महिलांना अर्थसाहाय्य मिळते. कोणत्याच महिन्यात त्याबाबत खंड पडलेला नाही. या प्रत्येक महिलेने भाजपलाच मत दिलेय असे मी म्हणत नाही; पण साठ टक्क्यांमधील किमान तीस टक्के महिलांनी निश्चितच भाजपला मत दिलेले असेल. अशा प्रकारे सत्तर टक्के महिलांचे मतदान हे भाजपच्या बाजूने झालेय, असा निष्कर्ष काढता येतो.
प्रश्न : पेडणे मतदारसंघाविषयी काय वाटते?
उत्तर : पेडणेतही भाजपचाच विजय होणार आहे, हे मी यापूर्वीच्या अनुभवावरून सांगतो. भाजपची सत्ता येईल हे निश्चित असल्याने लोक विद्यमान मंत्र्याचा पराभव कशाला म्हणून करतील. मतदारांना केवळ आमदार नको आहे, तर मंत्री हवा आहे. पेडणे तालुक्यात यापुढे उभा राहणारा आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ तसेच इलेक्ट्रॉनिक सिटी अशा प्रकल्पांमधून खूप मोठ्या संख्येने रोजगार संधी निर्माण होतील. हे प्रकल्प केवळ कागदोपत्री राहिलेले नाहीत. फिल्डवर त्याबाबत काम सुरू आहे.
प्रश्न : मुख्यमंत्री म्हणून केंद्रातील नेता येऊ शकतो काय?
उत्तर : काही दिवसांतच भाजपच्या कोअर टीमची बैठक होईल. त्या वेळी निवडणूक निकालाच्या दृष्टिकोनातून चर्चा करू. मी नुकताच दिल्ली भेटीवर जाऊन आलो. त्या वेळी एका मेजवानीच्या कार्यक्रमावेळी माझी भेट पक्षाचे अध्यक्ष अमित शहा व इतरांशी झाली; पण त्या वेळी काही चर्चा करता आली नाही. सध्या पक्षाचे सगळेच केंद्रीय नेते उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये व्यग्र आहेत.
प्रश्न : विधानसभेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकते काय?
उत्तर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता सर्व आमदारांचे भवितव्य सीलबंद झालेले असताना अधिवेशन बोलवावे हे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. विधानसभा अधिवेशन बोलावले नाही म्हणून विधानसभा विसर्जित करावी लागते काय, असे मला काहीजण विचारतात; पण मला तसे वाटत नाही. माझ्याकडे त्या विषयी आलेली फाईल मी अ‍ॅडव्होकेट जनरलांकडे सल्ल्यासाठी पाठवून दिली आहे. त्यांच्या सल्ल्याची मी प्रतीक्षा करत आहे. तथापि, सरकारचा काही दोष नसल्याने विधानसभा बरखास्तीची मला गरज वाटत नाही. निवडणुकीनंतर एक महिना निकाल राखून ठेवण्याचा निर्णय हा सरकारचा नव्हे, तो निवडणूक आयोगाचा आहे.

Web Title: The issue of jobs was delicate ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.