पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:55 PM2019-05-11T12:55:16+5:302019-05-11T12:56:08+5:30
पणजीच्या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे.
पणजी : पणजीच्या पोटनिवडणुकीनिमित्ताने सुरू असलेला जाहीर प्रचार संपुष्टात येण्यास आता फक्त सहा दिवस बाकी आहेत. पणजीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच प्रमुख लढत आहे आणि या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे.
येत्या 19 रोजी पणजीसाठी मतदान होणार आहे. पणजीतील 30 पैकी वीस-बावीस बुथ हे शिक्षित मतदारांचे आहेत. सुभाष वेलिंगकर यांच्या मते पणजीत पैशांची जादू चालत नाही. पंधरा टक्केच मतदारांवर पैशांचा प्रभाव पडतो व तोही पडला तर पडतो, असे वेलिंगकर म्हणतात. भाजपच्या काही महिला नगरसेविकांच्या मते पणजीत पैशांचा वापर सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र माजी महापौर वैदही नायक म्हणतात की- पैशांमुळे पणजीतील लोक बदलणार नाहीत, ते भाजपलाच मत देतील. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की- पैशांचा वापर भाजप करतोय की काँग्रेस पक्ष करतोय ते पणजीतील लोकांना लोकांना ठाऊक आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमधील कथित गैरव्यवहाराचा विषय हा चर्चेत आणला आहे. गोवा सुरक्षा मंचनेही हाच मुद्दा पणजीवासियांसमोर मांडणे सुरू ठेवले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे असे चोडणकर यांनी सांगत अनेक कागदपत्रेही जाहीर करण्याचा इशारा दिला. सुरक्षा मंच तर म्हणतो की भ्रष्टाचार नाही असे भाजपचे म्हणणे असेल तर भाजपने आपल्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करावा.
भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर व एकूणच भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पणजीतील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भाजपला निवडा असे आवाहन मतदारांना केले आहे. स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली पोटनिवडणूक आहे. ताळगाव मतदारसंघाची सुत्रे अनेक वर्षे मोन्सेरात यांच्याकडे आहे. ताळगावमध्ये अंतर्गत रस्ते खराब आहेत, असे भाजपच्या महिला नेत्यांचे म्हणणे आहे. पणजीतील महिलांची सुरक्षा, पणजीतील दहशतमुक्त वातावरण अशा गोष्टींचा विचार मतदारांनी करावा व मोन्सेरात यांना पराभूत करावे असा प्रचार भाजपच्या यंत्रणोने चालवला आहे. मोन्सेरात म्हणजे दहशत असे समीकरण केले गेले आहे. पणजीत 1995 सालानंतर एकदाही गँगवॉर झाले नाही, असा मुद्दा सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी नुकताच मांडला.