अल्पसंख्याकांना देशद्रोही ठरवणे सोपे झालेय: विजय सरदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 12:48 PM2024-04-26T12:48:08+5:302024-04-26T12:51:21+5:30
इंडिया आघाडीचा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या चावडी काणकोण येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण : भारतीयांसाठी संविधान हीच गीता, बायबल व कुराण आहे. तेच आज धोक्यात आहे. कोणत्याही अल्पसंख्याक व्यक्तीला आज देशद्रोही म्हणणे सोपे झाले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
इंडिया आघाडीचा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या चावडी काणकोण येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, आम आदमी पार्टीचे आमदार व्हेन्झी व्हिएगश, उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, बीना नाईक, तारा केरकर आदी अनेकजण उपस्थित होते.
संविधानाच्या गोष्टी करणाऱ्या भाजप सरकारने जनतेला न्याय द्यायला हवा. सभापती हे तटस्थ असायला हवेत. त्यांच्यासमोर आमदारांची अपात्रता याचिका आहे. ते गेले दीड वर्ष त्याच्यावर निर्णय देण्यास विलंब करीत आहेत, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.
भाजप सरकार दुसऱ्यावर राग काढण्यापलीकडे काहीच करीत नाही. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध त्यांनी सुडाचे राजकारण, कारस्थान सुरू केले आहे, असे असे व्हेन्झी व्हिएगश यांनी सांगितले. आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासही डबल इंजिनचे सरकार बंद पडले आहे, असे सांगून काणकोणात किडनी रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यासंबंधी संशोधन होऊन काणकोणवासीयांना दिलासा मिळण्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येईल, असे व्हिएगश म्हणाले.