पक्षात थोडी बेशिस्त आलीय, हे मान्य करावे लागेल: केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:38 AM2023-11-15T07:38:07+5:302023-11-15T07:39:03+5:30
भाजप नेते आणि माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी श्रीपाद नाईक यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानासंबंधी विचारले असता केंद्रीय मंत्र्यांनी हे उत्तर दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भारतीय जनता पक्षात दुफळी नाही. मात्र, थोडीशी बेशिस्त आलीय हे मान्य करावेच लागेल, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.
भाजप नेते आणि माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी श्रीपाद नाईक यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानासंबंधी विचारले असता केंद्रीय मंत्र्यांनी हे उत्तर दिले. नाईक म्हणाले की, पक्षात कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे. त्यात काही गैर नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाचे शिस्तबद्ध सेवक आहोत. जी काही मागणी करायची असते, ती योग्य प्रक्रियेमधून करणे ही पक्षाची शिस्त आहे. त्यामुळे मी एवढेच म्हणेन की, सध्या पक्षात थोडी बेशिस्त आली आहे.
ते म्हणाले की पक्षाचा निर्णय हा सर्वांना मान्य असतो. मलाही मान्य आहे त्यामुळे उगाच याविषयी अधिक बोलणे उचित होणार नाही. भाजपचे नेते आणि माजी मंत्री परुळेकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात श्रीपाद नाईक यांच्या उमेदवारी विषयी टिप्पणी करताना नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे, असे म्हटले होते. तसेच नाईक चार आमदारांनाही निवडून आणू शकत नाहीत, असेही म्हटले होते. याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केल्या.