राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे चुकच - भेंब्रे
By पूजा प्रभूगावकर | Published: December 9, 2023 01:19 PM2023-12-09T13:19:06+5:302023-12-09T13:19:42+5:30
भेंब्रे म्हणाले, की पुरस्कारांसाठी एकही महिला पात्र नाही ही मानसिकता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व खात्याची यामुळे उघड झाली आहे
पणजी - राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे ही चुकच आहे. या पुरस्कारांसाठी महिला कलाकार पात्र नाहीत, असे होऊच शकत नाही, अशी टीका ज्ञानपीठ पुरस्कार विजेता उदय भेंब्रे यांनी केली. गोव्याची लाेकसंख्या १६ लाख असून त्यातील अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. अशा स्थितीत यापैकी एकही महिला या राज्य पुरस्कारांसाठी पात्र नाही असे होऊ शकत नाही. जर महिलांचा या पुरस्कारांमध्ये समावेश केला नसेल तर तो करणे अपेक्षित होता असेही त्यांनी स्पष्ट केले.
भेंब्रे म्हणाले, की पुरस्कारांसाठी एकही महिला पात्र नाही ही मानसिकता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व खात्याची यामुळे उघड झाली आहे. हा सर्व जो गोंधळ झाला आहे, त्याला पुरस्कारांसंदर्भात नियुक्त केलेली समितीही तितकीच जबाबदार आहे. त्यांची ही चुक असून खरे तर त्यांनी ही चुक सुधारणे आवश्यक होते. मंत्री म्हणतात पुरस्कारांच्या विजेत्यांबाबत आपल्याला कल्पना नाही. आपली यात कुठलीच भूमिका नाही असे ते म्हणत आहे. प्रत्यक्षात मात्र पुरस्कार कुणाला द्यावा अशी शिफारस समितीने केल्यानंतर अंतीम मंजुरी हे मंत्रीच देतात. मंत्र्यांच्या मंजुरी नंतरच त्यावर शिक्कामोर्तब होतो असे त्यांनी सांगितले.