एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे अशक्य, महिला आमदारांना मंत्रिपद देण्यावर भाजपने केले स्पष्ट
By पूजा प्रभूगावकर | Published: September 27, 2023 04:55 PM2023-09-27T16:55:29+5:302023-09-27T16:56:01+5:30
महिला आरक्षणामुळे गोवा विधानसभेच्या १३ जागा महिलांसाठी आरक्षित होती. पक्षाला सक्षम अशा आमदार मिळतील. या स्थितीत त्यापैकी काहींना मंत्रिपद हे मिळेलच.
पणजी : एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे शक्य नाही. आम्ही तिन्ही महिला आमदारांना मंत्रिपद देऊ शकत नाही. कारण त्यांचे पती हे भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
महिला आरक्षणामुळे गोवा विधानसभेच्या १३ जागा महिलांसाठी आरक्षित होती. पक्षाला सक्षम अशा आमदार मिळतील. या स्थितीत त्यापैकी काहींना मंत्रिपद हे मिळेलच. केंद्र सरकारने संमत केलेले महिला आरक्षण विधेयकाचे आम्ही स्वागत करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तानावडे म्हणाले, की महिला आरक्षणाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. भाजप सरकारच्या काळात महिला या खऱ्या अर्थाने सक्षम बनल्या आहेत.जनगणना व फेररचनाची प्रक्रिया २०२६ सालापर्यंत पूर्ण झाली, तर निश्चितच २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुका या महिला आरक्षणानुसार पार पडतील, तसेच झाल्यास ४० पैकी १३ जागा या महिलांसाठी आरक्षित असतील. सध्या गोव्यात तीन महिला आमदार आहेत. सर्व जण या सक्षम आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे शक्य नाही. मात्र, त्यांचे पती मंत्रिपद भूषवत असल्याने एकाच कुटुंबातील दोन जणांना मंत्रिपद दिले जावू शकत नाही असे तानावडे यांनी स्पष्ट केले.