राज्यात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक होणे गरजेचे: मेधा पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 07:49 AM2024-01-06T07:49:31+5:302024-01-06T07:50:05+5:30
'गोंय स्वातंत्र्याचे होमखण' च्या डिजिटल कॉपीचे अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. यामध्ये देशभरातील लहानथोरांचा समावेश आहे. या सगळ्यांबद्दल माहिती असणे आणि ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या 'गोंय स्वातंत्र्याचे होमखण' या माहितीपटाचे विशेष स्वागत केले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.
प्रसिद्ध लेखिका आणि सिनेनाट्य निर्मात्या ज्योती कुंकळकर दिग्दर्शित आणि निर्मित 'गोंय स्वातंत्र्याचे होमखण' या माहितीपटाच्या डिजिटल कॉपीचे अनौपचारिक अनावरण केल्यानंतर त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमात मेधा पाटकर, वामन प्रभु, ज्योती कुंकळकर, सहनिर्माती संपदा कुंकळकर, विलास प्रभू यांची उपस्थिती होती. गोमंतकीयांनी ४५० वर्षे पोर्तुगीजांचा जुलुमी कारभार व अत्याचार सहन केला. त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. एखाद्या राज्याचा भूगोल बदलता येतो. मात्र, घडून गेलेला इतिहास बदलता येत नाही, असे कुंकळकर यावेळी बोलताना म्हणाल्या.
ज्यांनी या राज्याच्या मुक्तीसाठी प्रचंड हालअपेष्टा भोगल्या, तुरुंगवास भोगला, अनेक वर्षे चिंबल येथे कार्यरत असलेल्या पद्मश्री मोहन रानडे यांचे स्मारक चिंबल येथे उभारणे नितांत गरजेचे आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. वामन प्रभू यांनी स्वागत केले.