विद्यार्थीदशेत मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे: केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:39 PM2023-02-28T14:39:36+5:302023-02-28T14:40:02+5:30
विद्यावृद्धी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शिक्षणाला पर्याय नाही, हे खरेच आहे. योग्य शिक्षण आणि विद्यार्थीदशेत चांगले संस्कार लाभले तर मोठी होऊन हीच मुले पुढे देशाचे जबाबदार नागरिक बनू शकतात. ही जबाबदारी शिक्षण संस्थांवर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. विद्यावृद्धी शिक्षण संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त फोंडा येथील राजीव कला मंदिरात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योगपती राजेश चेंपो, ओबीसी आयुक्त मनोहर आडपईकर, विद्यावृद्धी संस्थेचे अध्यक्ष उदय डांगी, विद्यावृद्धी विद्यालय किड्स नेस्टच्या मुख्याध्यापिका रुक्मी डांगी, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संकेत मुळे, मीरा नाईक, माधुरी पाटील, राघवेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माधुरी पाटील यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. विशेष प्रावीण्यप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्हे देऊन कौतुक करण्यात आले. औपचारिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. डांगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका डांगी यांनी आढावा घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"