गोव्याविषयी चुकीची माहिती रोखणे गरजेचे; रोहन खंवटे यांचे विधानसभेत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:28 AM2023-08-05T10:28:26+5:302023-08-05T10:31:52+5:30
चुकीची माहिती दिली जात असून हे थांबवण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सोशल मीडियाद्वारे गोव्याची चुकीची माहिती दिली जात आहे. या गोष्टी थांबण्याची गरज असल्याचे मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासावेळी व्यक्त केले.
पर्यटन खात्याकडून गोवा पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धिसाठी देश- विदेशात आयोजित केल्या जाणाऱ्या इव्हेंटचा खरेच गोव्याला फायदा होत आहे का? असा प्रश्न मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केला होता. त्यावर मंत्री खंवटे बोलत होते.
कामत म्हणाले की, गेल्या काही वर्षात पर्यटन खात्याने पर्यटन प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने विदेशात ७६ इव्हेंट केले. म्हणजे वर्षाला सरासरी १५ इव्हेंट होतात. मात्र या इव्हेंटचा गोव्याला खराच फायदा होत आहे का? जर होत असेल तर तो कसा होतो? असा प्रश्न त्यांनी केला.
त्यावर मंत्री खंवटे म्हणाले की, गोवा पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहे. युके, रशिया या दोन देशांचे विदेशी पर्यटक हे गोव्यात येतातच. मात्र युक्रेन व रशिया दरम्यान झालेल्या युद्धाचा रशियन पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता अन्य देशांच्या पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी पावले उचलली जात आहे. त्यासाठी विदेशात अनेक इव्हेंट केले जात आहेत. किनारी पर्यटनाव्यतिरिक्तही हिंटरलँड पर्यटनावर भर दिला जात आहे. चुकीची माहिती दिली जात असून हे थांबवण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.