दलालांविरुद्ध कारवाई पोलिसांचीच जबाबदारी! पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची पोलिस अधीक्षकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 09:10 AM2023-04-14T09:10:06+5:302023-04-14T09:12:01+5:30
पर्यटन खात्याचे सचिव प्रविमल अभिषेक हेही यावेळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांना किनारपट्टीतील दलालांवर कारवाईबाबत पोलिसांनी हात झटकून चालणार नाही, असे सांगत पोलिसांनीच कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. पर्यटन खात्याचे सचिव प्रविमल अभिषेक हेही यावेळी उपस्थित होते.
आयएएस अधिकारी असलेले वाल्सन यांनी बुधवारी दलालांवरील कारवाईचे अधिकार पर्यटन खात्यालाही आहेत. मग पर्यटन अधिकारी गप्प का? असा सवाल केला होता. याची गंभीर दखल घेऊन पर्यटन मंत्र्यांनी काल तातडीने त्यांना बोलावून घेतले. खात्याच्या सचिवांकडूनही काही माहिती जाणून घेतली. वाल्सन यांना कारवाईच्या बाबतीत पर्यटन खात्याची भूमिका मर्यादित असल्याचे सांगून पोलिसांनीच हे काम करावे लागेल. जबाबदारी झटकून चालणार नाही, असे खंवटे यांनी वाल्सन यांना सांगितले.
कळंगुट, कांदोळी किनारपट्टीवरील दलाल, फिरते विक्रेते त्यांच्याविरुद्धच्या कारवाईवरून पर्यटन मंत्री रोहन खंवटे व स्थानिक आमदार मायकल लोबो तसेच पोलिस अधीक्षक निधी वाल्सन यांच्यात द्वंद्व पेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही त्याची दखल घ्यावी लागली. खंवटे यांनी काही दिवसांपूर्वी कळंगुट पोलिस निष्क्रीय असल्याचा आरोप करून कारवाई होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आमदार मायकल लोबो यांनी पोलिसांची बाजू उचलून धरत कळंगुट पोलिस स्थानकात कमी मनुष्यबळ असूनही पोलिस चांगली कामगिरी बजावत असल्याचे म्हटले होते
कडक कारवाईसाठी आधी कायदा सक्षम करा, असे लोबो यांचे म्हणणे आहे. कळंगुट, कांदोळी किनारपट्टीवरील वाढत्या बेकायदा कृत्यांबाबत गेले काही दिवस वातावरण तापलेले आहे. आता डीजीपींनाही आदेश गेल्याने पुढील काही दिवसात कारवाई तीव्र होणार आहे.
एकमेकांना दोष देऊन चालणार नाही
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही बैठक फलदायी झाल्याचा दावा करताना पर्यटक संचालक तसेच पोलिस अधीक्षकांकडून आलेल्या सूचनांनुसार आता दलालांवरील कारवाई अधिक सुलभ होईल, असे म्हटले आहे. एकमेकांना दोष देऊन चालणार नाही. पोलिस आणि पर्यटन खात्याने संयुक्तपणे काम करावे लागेल. खंवटे म्हणाले की, पोलिस जेव्हा दलालांना पकडतात तेव्हा त्यांना शिक्षा होणे किंवा कठोर कारवाई होणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी किनाऱ्यांवर खडा पहारा द्यावा लागेल. पर्यटन खात्याने आदेश काढलेला आहे, त्यानुसार पोलिसांनी कारवाई करायला हवी.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
किनारपट्टीवर बेकायदा कृत्ये करणायांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. दलाल, फिरते विक्रेत्यांविरुद्ध आता कडक मोहीम सुरु होणार आहे. या भागात करडी नजर ठेवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
किनारी भागात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू
किनारी भागात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. उत्तर गोव्यात २८० जणांवर कारवाई केली आहे. या २८० जणांपैकी २० टक्के हे दलाल आहेत. ही कारवाई चालूच राहणार असून यासाठी पर्यटन खात्याशीही समन्वय साधला जाईल. -निधीन वाल्सान, पोलिस अधीक्षक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"