गोडसेचे उदात्तीकरण झाल्यास नवल नव्हे : शांताराम नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 12:58 PM2017-11-19T12:58:56+5:302017-11-19T13:03:26+5:30
केंद्र सरकारकडून येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण झाल्यास नवल मानले जाऊ नये, अशी टीका करताना
पणजी : केंद्र सरकारकडून येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण झाल्यास नवल मानले जाऊ नये, अशी टीका करताना माजी राज्यसभा खासदार तथा काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी हिन्दू महासभेने मध्यप्रदेशात ग्वाल्हेर येथे गोडसेचे मंदिर उभारल्या प्रकरणी महासभेचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाईच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या शंभराव्या जयंतीदिनानिमित्त येथील काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे करुन बांगलादेश निर्माण केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही इंदिराजींना दुर्गा असे संबोधले होते. मात्र आजकाल भाजपवाले काँग्रेसमध्ये होऊन गेलेल्या महान नेत्यांचे कार्य लपवून भलत्याच लोकांचे उदात्तीकरण करीत आहेत, असा आरोप शांताराम यांनी केला.
ग्वाल्हेरमध्ये नथुराम गोडसे याचे मंदिर बांधले जाते. या मंदिराला नगर नियोजन खात्याचा किंवा अन्य संबंधित खात्याचे परवाने मिळतातच कसे? असा सवाल करुन मुख्यमंत्री शिवराज चौहान हेही तितकेच जबाबदार आहेत, असा आरोप शांताराम यांनी केला. गुजरातमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उदोउदो केला जातो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्वाल्हेरमध्ये गोडसेचे मंदिर बांधले आहे याची कल्पना नाही का?, असा प्रश्नही त्यांनी केला. ग्वाल्हेरप्रमाणे देशात सर्वत्र आता अशी मंदिरे येतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
शांताराम पुढे म्हणाले की, इंदिराजींचे कार्य त्या काळी विरोधी नेतेही प्रामाणिकपणे मान्य करीत असत. हा प्रामाणिकपणा आजच्या भाजप नेत्यांमध्ये नाही.
गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले की, १९७0 च्या फाळणीवेळी इंदिराजींचे कौतुक झाले. परंतु आज या गोष्टीचे राजकारण केले जात आहे. इंदिराजी या ‘आयर्न लेडी’ म्हणून परिचित होत्या. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची वानरसेना सुरु केली. स्वातंत्र्यसैनिकांवर उपचार करण्याचे काम ही सेना करीत असे. पंतप्रधान बनल्यानंतर सुवर्णमंदिर कारवाई केली. आपल्या जिवाला धोका आहे हे माहीत असूनही त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले.’
पक्षाचे प्रदेश प्रधान सरचिटणीस आल्तिनो गोम्स, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा एजिल्दा सापेको, सैफुल्ला खान आदी नेत्यांची यावेळी भाषणे झाली. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी बाबी बागकर, विजय भिके आदी यावेळी उपस्थित होते. विजय पै यांनी आभार मानले.
दरम्यान, अॅड. यतिश नायक यांची प्रदेश काँग्रेस समितीच्या कायदा विभागाच्या चेअरमनपदी तर फिलू डिकॉस्ता यांची काँग्रेसच्या असंघटित कार्यकर्ते विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणारा आदेश पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काढला आहे. रविवारी ही घोषणा करण्यात आली.