गोव्यात २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 01:09 PM2020-01-23T13:09:50+5:302020-01-23T13:09:58+5:30

पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

Is it possible to keep multiplexes, malls, restaurants open in Goa for 24 hours? | गोव्यात २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का?

गोव्यात २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का?

Next

पणजी : पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांचे मत असे आहे की, गोव्यात हा प्रयोग करता येईल. परंतु व्यावसायिकांकडून प्रस्ताव येऊ द्या, या प्रस्तावावर नंतर अभ्यास करून काय तो निर्णय घेता येईल.

गोवा जागतिक नकाशावरील पर्यटन स्थळ म्हणून धडकत आह. येथील किनारी भागात एरवीच नाईट लाईट सुरू असते. देश-विदेशातून जिवाचा गोवा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या नाईट लाईफची भुरळ पडलेली आहे. कळंगुट, बागा हणजुण यासारखे ठिकाणी नाईट लाईफ सुरू झाले आहे, कळंगुट भागातील रेस्टॉरंट, शॅक पहाटेपर्यंत उघडे असतात. तेथे मद्य पुरवठाही केला जातो.

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचा चांगला निर्णय आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे. येथे नाईट लाइफचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. रात्रीच्या वेळी मॉल्स, मल्टिप्लेक्स उघडे ठेवल्यास पर्यटन व्यवसाय त्याचा फायदा होईल. मात्र त्याचबरोबर पोलिसांच्या गस्ती वाढवायला हव्यात. गोव्याचे नाव बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी.
दुसरीकडे काहीजणांचे मत असे आहे की, सध्या तरी हे शक्य नाही.

अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की रात्रीच्या वेळी मॉल्स, रेस्टॉरंट सुरू ठेवायची झाली तर आधी लोकांची रहदारी असायला हवी. बागा, कळंगुट आदी किनारी भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालतात. राजधानी पणजी शहरात कॅसिनोवर लोक येतात. त्यामुळे काहीशी वर्दळ असते, परंतु जोपर्यंत पुरेशी वर्दळ होत नाही, तोपर्यंत हे शक्य होईल असे वाटत नाही. रात्रीची आस्थापने चालू ठेवण्यासाठी सरकारने धोरण तयार करायला हवे. एखादी गोष्ट आरंभशूरपणे सुरू करणे आणि सहा महिन्यातच बंद करणे, असे होता कामा नये.

धोंड यांचे राजधानी शहरात हॉटेल आहे ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे येणारे देशी पर्यटक हे पुन्हा पुन्हा गोव्याला भेट देणारे असतात. गोवा आता महागडे डेस्टिनेशन बनले आहे. भारतीय पर्यटक गुजरात, कर्नाटक, केरळ तसेच शेजारी सिंधुदुर्ग-रत्नागिरीला जातात. कोकणात चांगले किनारे आहेत. तसेच तेथे जलक्रीडाही सुरू झालेल्या आहेत.  त्यामुळे पर्यटक तेथे जातात.

पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले की, पणजी शहराचा विचार केला तर रात्रीच्यावेळी केवळ कॅसिनोंमुळे शहरात वर्दळ असते. स्थानिक लोक फिरकत नाहीत. पूर्वी रात्री ८ वाजताच पणजीत सामसूम होत असे. मल्टिप्लेक्स, मॉल्स किंवा  रेस्टॉरंट तास खुले ठेवण्याचा प्रयोग केला तर तो चालेल असे वाटत नाही. पणजी मार्केट कूळ संघटनेचे सचिव धर्मेंद्र भगत म्हणाले की, आधीच स्थानिक दुकानदारांना मॉलनी जेरीस आणले आहे. रात्रीचे उशिरा मॉल चालू राहिल्यास त्याचा मोठा फटका स्थानिक दुकानदारांना बसेल. मॉलना मुभा दिली तर मग बाजारपेठेत दुकानेही रात्रीची खुली का नको? असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Is it possible to keep multiplexes, malls, restaurants open in Goa for 24 hours?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.