राजकारणात टिकण्यासाठी लागतो पैसा! अनेक ऑफर नाकारल्या; रेजिनाल्ड लॉरेन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 09:11 AM2023-04-15T09:11:38+5:302023-04-15T09:12:20+5:30
पैशांशिवाय राजकारण शक्य नाही. परंतु मला राजकारणासाठी पैसा लागत नाही. पैशाच्या मागे लागलो असतो तर कुठल्या कुठे पोचलो असतो, असे कुडतरीचे अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पैशांशिवाय राजकारण शक्य नाही. परंतु मला राजकारणासाठी पैसा लागत नाही. पैशाच्या मागे लागलो असतो तर कुठल्या कुठे पोचलो असतो, असे कुडतरीचे अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले.
निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या कथित ऑफरबद्दल विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. राजकारण्यांना पैसा लागतो, परंतु मी त्यातला नव्हे. राजकारणात येऊन मी घरेही बांधली नाहीत किंवा बक्कळ पैसाही केला नाही. असे ते म्हणाले. काँग्रेसचे आठ आमदार आठ महिनेही विरोधात राहू शकले नाहीत. मी दहा वर्षे विरोधात होतो. मलाही ऑफर होत्या. पर्रीकर मला विचारायचे की, तूच का विरोधात बोलतोस. तुझ्या मतदारसंघात कामे करुन घे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेमध्ये मीच आवाज उठवणारा होतो, त्यावेळी काही कॉंग्रेस नेत्यांनी मला दाबून ठेवले. मी काँग्रेमधून बाहेर पडलो याचा आनंद आहे. मी नेहमीच मेहनत घेणार आणि माझे ध्येय गाठणार. मी भाजपाविरोधात काँग्रेस नेत्यांनी मला त्यावेळी भाजप सरकारविरोधात बोलायला लावून आपले कामे करुन घेतली. एका माजी प्रदेशाध्यक्षाने मी पैसे घेतल्याचाही आरोप केला.
या प्रदेशाध्यक्षाने आजही देवासमोर यावे, मीही येईन. मी पक्षांतर केलेले नाही. अपक्ष म्हणून स्वबळावर निवडून आलो आणि नंतर सरकारला पाठिंबा दिला. मी लढत राहिलो. चुका सुधारल्या आणि उभा राहिलो. मी कुठून आलो आणि कुठे जायचे हे मला ठावूक आहे, माझा राजकीय प्रवास संपलेला नाही.
विरोधक जबाबदारी विसरलेत
सध्या म्हादई, कॅसिनो तसेच अन्य विषय गाजत असताना तुम्ही गप्प का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे मी माझ्या भावना व्यक्त करतोच. विरोधक त्यांचे काम योग्यरित्या करताना दिसत नाहीत. सरकारला पाठिंबा देऊन लोकांची अनेक कामे करुन घेतली. सोनसडो प्रश्न मार्गी लावला. आता हायकोर्ट मॉनिटर करीत आहे हे चांगलेच आहे. कुडतरी मतदारसंघ मॉडेल मतदारसंघ बनवणार. सरकार कुठे चुकत असेल तर मी सांगतोच मला कोणीही अडवू शकत नाही. मुख्यमंत्री प्रत्येक बाबतीत मला सहकार्य करतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"