पार्सेकरांविरुद्ध भाजपाकडून शिस्तभंगाची कारवाई शक्य, बंडामुळे पक्षात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 12:05 PM2018-10-20T12:05:20+5:302018-10-20T12:07:21+5:30

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध शरसंधान करत भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष चेतविण्याचे काम चालविल्यानंतर प्रदेश भाजपा हळूहळू चिंताग्रस्त बनू लागला आहे.

It Was The Mistake Of BJP To Form Government In Goa: Ex CM Laxmikant Parsekar | पार्सेकरांविरुद्ध भाजपाकडून शिस्तभंगाची कारवाई शक्य, बंडामुळे पक्षात अस्वस्थता

पार्सेकरांविरुद्ध भाजपाकडून शिस्तभंगाची कारवाई शक्य, बंडामुळे पक्षात अस्वस्थता

Next

पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध शरसंधान करत भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष चेतविण्याचे काम चालविल्यानंतर प्रदेश भाजपा हळूहळू चिंताग्रस्त बनू लागला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते असलेले पार्सेकर हे बंडाच्या भूमिकेत असून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागण्यापासून भाजपाच्या कोअर समितीवरीलही काही सदस्यांना आव्हान दिलेले असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. मात्र यापुढे पार्सेकरांविरुद्ध भाजपाकडून शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पार्सेकर हे मुख्यमंत्री होते. म्हणजेच मनोहर पर्रीकर यांच्यानंतर पार्सेकर हे भाजपाचे सर्वात मोठे नेते ठरले होते. पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले तेव्हा गोव्यात पार्सेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविली गेली होती. पार्सेकर यांचे मांद्रे मतदारसंघाकडे व तेथील कार्यकर्त्यांकडे याच काळात दुर्लक्ष झाले असे पक्षात मानले जाते. कारण 2017 च्या निवडणुकीत मांद्रेत पार्सेकर यांचा दारूण पराभव झाला. पक्षाचे अनेक मंत्री, आमदार हरले. पार्सेकर यांना भाजपाने अपयशाचे धनी बनविले. पर्रीकर किंवा भाजपा प्रदेशाध्यक्षांनी अपयशामध्ये स्वत:चा काहीच वाटा नाही असेच वर्तन निवडणूक निकालानंतर कायम ठेवले. मात्र ती निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली नव्हती, त्या निवडणुकीवेळी तिकीट वाटपाचे सगळे काम पर्रीकर यांनी केले होते व पक्षाचा जाहिरनामा तयार करण्यापासून प्रचार यंत्रणा राबविण्यापर्यंतची सगळी कामे पर्रीकर व पक्ष संघटनेने केली होती, असे पार्सेकर यांचे म्हणणे आहे. 

पार्सेकर यांनी जाहीरपणे हे सांगणे सुरू केले आहे. मांद्रेमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची पार्सेकर  यांनी बैठक घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्षांवर जोरदार हल्ला चढविला आहे. पार्सेकर यांचे राजकीय विरोधक दयानंद सोपटे यांना भाजपाने पक्षात प्रवेश दिल्यानंतर पार्सेकर खूप दुखावले गेले आहेत. त्यांनी उघडपणे बंडाचीच भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते असून आम्ही भाजपामध्येच आहोत, असे पार्सेकर सांगतात पण त्यांचे सध्याचे वर्तन पाहता पक्ष त्यांच्याविरोधात कारवाई करू शकतो, अशीही माहिती मिळते.

Web Title: It Was The Mistake Of BJP To Form Government In Goa: Ex CM Laxmikant Parsekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.