आणि श्री देव बोडगेश्वरानेच आम्हाला दर्शन दिले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 10:39 AM2024-01-29T10:39:05+5:302024-01-29T10:39:50+5:30
आजही तो प्रसंग आठवून माझ्या शरीरावर रोमांच उभे राहतात. बोडगेश्वराचा त्या दिवशी खरोखरच प्रत्यय येऊन मी धन्य झालो.
डॉ. राजीव कामत
श्री देव बोडगेश्वर देवस्थान सबंध गोव्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. बोडगेश्वर कुठल्याही संकटप्रसंगी भक्तांची राखण करतो अशी श्रद्धा आहे. माझ्याच बाबतीत वीस वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग, माझे एक मुंबईस्थित स्नेही दरवर्षी सिंधुदुर्गातील आरवली, शिरोडा येथे आपल्या मूळ घरी वास्तव्याला यायचे. तिथे येऊन स्थिरस्थावर झाल्यावर ते मला तीन-चार दिवस आरवलीला यायचा आग्रह करायचे. मी पत्नीसह जायचोही. त्यावर्षीसुद्धा त्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर आम्ही तिथे जायचे ठरवले. त्यानुसार मी त्यांना येण्याचा दिवस कळवला. आम्ही संध्याकाळी म्हापशातून निघायचं ठरवलं. पण दुर्दैवाने त्या दिवशी सहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबेल म्हणून अर्धातास वाट पाहिली, पण पावसाचा जोर अधिकच वाढला. त्या स्नेह्यांना येत नाही कळविण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण लागेचना, तेव्हा श्री बोडगेश्वराचं नाव घेऊन हा ४० किलोमीटरचा प्रवास करायचं ठरवून निघालो.
प्रचंड पावसामुळे समोरचा रस्तासुद्धा नीट दिसत नव्हता. गाडी हळू चालवत न्हयबाग पुलाजवळ पोचलो. पुलावर पाणी साचले होतं. बाकी चिटपाखरूही नव्हतं... त्याचवेळी कुठूनतरी रेनकोट घातलेला, डोक्यावर छत्री घेतलेला एक माणूस गाडीसमोर येऊन हातवारे करून मला थांबायला सांगू लागला. तो पोलिस असेल असं वाटून मी गाडी थांबवली. मी खिडकीची काच खाली करून त्याला काही विचारणार इतक्यात त्याने अजीजीने त्याला मळेवाडपर्यंत सोडण्याची विनंती केली. अंधारात मी त्याचा चेहरासुद्धा पाहू शकत नव्हतो. तरी धैर्य करून त्याला गाडीत बसायला सांगितलं.
गाडीत बसल्यावर त्याने जुजबी बोलायला सुरुवात केली. तेव्हा समजलं की तो आजगावला राहणारा असून, ते गाव आरवलीच्या आधी लागतं. तो वास्कोला कामाला असून, पावसामुळे शेवटची बस चुकली. थोड्या वेळाने तो बऱ्यापैकी बोलका झाला. आमच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारू लागला. थोड्या वेळात आम्ही मळेवाडजवळ पोचलो. तेव्हा तिथला पूल पुरामुळे पूर्ण पाण्याखाली गेला होता, त्यामुळे आमची पुढची वाटच खुंटली होती. आता काय करायचं या विचारात असताना तो म्हणाला "डॉक्टरसाहेब, तुम्ही गाडी वळवा, मी तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने मळेवाडला पोहोचवतो. मी या भागातलाच असून, मला रस्ता माहीत आहे." त्याच्यावर विश्वास ठेवून, मनात बोडगेश्वराचा धावा करत मी गाडी वळवली. त्याने सांगितलेल्या निर्जन, रानातील आडरस्त्यावरून आम्ही कसंबसं मळेवाड गाठलं, प्रवासात तो मला, मी तुझ्याबरोबर आहे असं सांगून धीर देत होता. पुढचा रस्ता तसा चांगला असल्यामुळे आणि पाऊस कमी झाल्यामुळे मी गाडी आरवलीच्या दिशेने वळवली.
आता पाऊस बऱ्यापैकी थांबला होता. थोड्या वेळात आम्ही आजगावला पोहोचलो. त्याने गाडी थांबवण्याची विनंती केली. गाडीतून उतरून माझे आभार मानण्यासाठी खिडकीपाशी आला. त्याचवेळी लख्खकन वीज चमकली आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला, आभार मानून तो वळला आणि मी माझा चेहरा बायकोच्या दिशेने वळवला. त्याचवेळी दोघांच्या तोंडून एकाचवेळी उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, "हा माणूस अगदी बोडगेश्वरासारखा दिसतो नाही?" आजही हा प्रसंग आठवून माझ्या शरीरावर रोमांच उभे राहतात. बोडगेश्वराचा त्या दिवशी खरोखरच प्रत्यय येऊन मी धन्य झालो.